आधीच आभाळ फाटलं, आता उपाशी राहण्याची वेळ, डबेवाल्यांचा एक निर्णय अन् मुंबईकरांचे हाल होणार?

मुंबईत बरसणाऱ्या पावसाने कहर माजवला आहे. गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाचा फटका मुंबईकरांना देखीलबसला आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना मुंबईच्या डबेवाल्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे.

आधीच आभाळ फाटलं, आता उपाशी राहण्याची वेळ, डबेवाल्यांचा एक निर्णय अन् मुंबईकरांचे हाल होणार?
| Updated on: Jul 06, 2026 | 12:18 PM

मुंबईला गेल्या 4 दिवसांपासून पावसाने चांगलंच झोडपलं आहे. मुसळधार सुरु असलेला पाऊस विश्रांती घेण्याचं नाव देखील घेत नाहीये. अनेक ठिकाणी पाणी गुडघ्यांपर्यंत भरलं आहे तर, रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं आहे. अशात डबेवाल्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांवर उपाशी राहण्यची वेळ येणार आहे. सोमवारी मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे डबेवाल्यांनी आज डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवली आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. झाडं उन्मळून पडली आहेत. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

आज मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद…

मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे मुंबईतील डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार आहे. डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितल्यानुसार, मुसळधार पावसामुळे विरार-वसई भागातील अनेक डबेवाल्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. 125 वर्षांची परंपरा असली तरी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे, यावर असोसिएशनने भर दिला; त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प

एवढंच नाही तर, अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याचा फटका बसत आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल संस्थेने दिलगिरी व्यक्त केली आहे. विविध स्थानकांवर साचलेल्या पाण्यामुळे रेल्वेच्या कामकाजावरही परिणाम होत आहे; किमान 16 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि 9 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, अत्यंत आवश्यक असल्यास आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असे आवाहन बीएमसीने (BMC) नागरिकांना केले आहे.

भारतीय हवामान विभागाने आजही मुंबईतील काही भागांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीएमसीने ट्विट करत सांगितलं, शहर आणि उपनगरांमध्ये सतत पाऊस पडत आहे. काही भागांत अतिवृष्टीची शक्यता असून, काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचाही अंदाज आहे. या काळात अधूनमधून ताशी 60 ते 70 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही आहे.

Follow Us