…म्हणूनच बाबा पाण्यावर तरंगतोय, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
चुलीवरच्या बाबानंतर हिंगोलीत पाण्यात तरंगणाऱ्या बाबांची चर्चा आहे. हात-पाय न हलवता बराच वेळ हे बाबा पाण्यात तरंगतात. याला अंनिसनं चॅलेंज दिल्यानंतर अंनिस कार्यकर्ता आणि बाबा दोघांमद्ये सामना रंगला. दोघंही विहीरत उतरुन तरंगू लागले.

हिंगोली : मार्च एन्डला चुलीवरचा बाबा चर्चेत होता, जो बाबा तापत्या तव्यावर बसून भक्तांच्या समस्या ऐकायचा. 1 एप्रिलला महाराष्ट्रातल्या कालीचरण बाबानं महात्मा गांधींच्या हत्येचं समर्थन करुन गोडसेला दंडवत घातलं. 2 एप्रिलला बागेश्वर बाबानं गिधड आणि शेरचं उदाहरण देत अप्रत्यक्षपणे साईबाबा हिंदू होते की मुस्लिम या वादावर बोट ठेवलं. आणि आता हिंगोलीतला पाण्यावरचा बाबा समोर आलाय. हिंगोलीतल्या धोतरा गावात भागवत कथा सुरुय. हरिभाऊ राठोड नावाचे ग्रहस्थ कथेचं वाचन करत होते. वाचन करणाऱ्या बाबांनीच आपण दैवीकृपेनं पाण्यावर तरंगण्याचा दावा केला. 14 महिने उपवास, ब्रह्मचर्य, मनशुद्धी आणि नामस्मरणामुळेच आपण आणि त्यांची पत्नीही पाण्यात तरंगू शकते, असं बाबा हरिभाऊ राठोडांचं म्हणणंय.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नेमकं म्हणणं काय?
तरंगणाऱ्या बाबाची बातमी पसरताच लोकांनी गर्दी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा चमत्कार नसून पोहोण्याचाच एक प्रकार असल्याचा दावा केला. आव्हान म्हणून अंनिसकडूनही पाण्यावर तरंगणारा एक व्यक्ती गावात पोहोचला. मग काय भागवत करणारे बाबा आणि अंनिसचा कार्यकर्ता दोघं विहीरिवर पोहोचले. विहिरीभोवती गर्दी जमली. आधी बाबा पाण्यात उतरले आणि काही सेकंदात तरंगू लागले. तुलनेनं अंनिसचा कार्यकर्ता मात्र जितका वेळ बाबा तरंगू शकले, तितका वेळ पाण्यात राहू शकला नाही.
आता फक्त बाबा हरिभाऊ राठोडच पाण्यात तरंगतात का? तर असं अजिबात नाही. याआधी देशातून अनेकदा अशा तरंगणाऱ्या बाबांच्या बातम्या झाल्या आहेत. एक बाबा तर चक्क पाण्यात तरंगून पेपरही वाचायचा. पण प्रश्न हा आहे की पाण्यावर दैवीशक्ती प्राप्त झाल्यावरच तरंगता येऊ शकतं? खरोखर त्यासाठी १४ महिने उपवास आणि ब्रह्मचर्य पाळावं लागतं? तर असं अजिबात नाही. पाण्यावर तरंगण्याचा हा प्रकार योगाचा भाग आहे. अनेक जण याला जलासनही म्हणतात.
हे आहेत बलराम शरण बाबा. तरंगण्यासह पाण्यात कोणकोणती योगासनं करता येतात, याची त्यांनी प्रात्यक्षिकं करुन दाखवलीयत. पाण्यात तरंगून त्यांनी पुस्तकवाचनासह बासरीवादनही केलंय. देशातल्या अनेक भागात जलासन योगाचं प्रशिक्षणही दिलं जातंय. यातलं आश्चर्य म्हणजे योगबाबा बलराम शरण यांचं पाण्यावर तरंगण्याचं हे प्रात्यक्षिक 20 एप्रिल 2012 ला चित्रित झालंय. खुद्द दुरदर्शननं योगासनांबद्दल जागृती वाढावी या हेतूनं हा कार्यक्रम प्रसारित केला होता. आज तब्बल एक दशकानंतर तोच प्रकार करुन एक बाबा त्याला दैवशक्ती मानतो आणि असंख्य लोक त्यावर विश्वासही ठेवतात.
कुणी पाण्यावर तरंगणाऱ्या या प्रकाराला दैवीशक्ती म्हणतंय. तर कुणी त्यालाच शास्र सांगतंय. हिंगोलीतल्या बाबा म्हणतोय की १४ महिने नामस्मरण आणि ब्रह्मचर्यानंतर कुणीही हे करु शकतं. तर परदेशात भारताची देण असलेल्या योगासनांचा आधार घेऊन यावर शास्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातंय.
