Iran America War : थोड्यावेळापूर्वीच घरच्यांशी फोनवरून बोलणं अन् काही क्षणात.. पुण्याच्या ‘हेरंब’चा होर्मुझच्या समुद्रातच धक्कादायक अंत
इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू झाला. पुण्याच्या हेरंबच्या मृत्यूने कुटुंबीय शोकाकूल असून कोणाचाच यावर विश्वास बसत नाहीये. वृद्ध आई-वडिलांना अश्रू अनावर झालेत.

इराण आणि अमेरिकेतील पेटलेला संघर्ष अजूनही कायम असून दिवसेदिंवस तो आणखीनच धुमसत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आले. यायुद्धाची झळ पुन्हा संपूर्ण जगाला तसेच भारतालाही जाणवू लागली असून कच्च्या तेलाचे भावही भडकताना दिसत आहेत. त्याचा परिणाम भारतात इंधनाच्या दरांवर होऊ शकतो, तसेच महागाईची झळही सोसावी लागू शकते. दरम्यान होर्मुजच्या सामुद्रधीनीतील एका जहाजावर झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. इराणने यूएईचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला केला होता. मंगळवारी पहाटे होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये ओमानच्या हद्दीत इराणने दोन जहाजांना लक्ष्य केलं. 2 टँकर जहाजांवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी झाले. हेरंब करमरकर असे त्यांचे नाव असून ते पुण्याचे रहिवासी होते अशी माहिती समोर आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून करमरकर कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
होमुर्झच्या समुद्रधुनीत झालेल्या भीषण हल्ल्याने या कुटुंबाच्या आयुष्याला कायमची जखम दिली आहे. पुण्याचे अभियंता आणि मर्चंट नेव्ही अधिकारी हेरंब करमरकर यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना एकच आशा होती की, हेरंब कुठेतरी सुरक्षित असतील आणि लवकरच परत येतील. मात्र, मंगळवारी आलेल्या अधिकृत माहितीनंतर ती आशाही संपली. एम व्ही जीएफएस गॅलेक्सी या नौकेवर हेरंब करमरकर कार्यरत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतून प्रवास करत असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास तिच्यावर अचानक हल्ला झाला. हवाई हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमजवळ भीषण आग लागली. दुर्दैवाने, त्यावेळी हेरंब याच भागात होते.
या नौकेवर एकूण 24 कर्मचारी होते, त्यापैकी 11 जण भारतीय होते. ओमानच्या नौदलाने तातडीने बचावकार्य सुरू करत 23 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, हेरंब करमरकर यांचा शोध लागला नाही. त्यांच्या बेपत्ता होण्याच्या बातमीनंतर पुण्यातील त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती की, हेरंब सुखरूप परत यावेत.
फोनवरून झालं होतं बोलणं अन् थोड्याच वेळात हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी हेरंब यांनी कुटुंबाशी शेवटचा संवाद साधला होता. रविवारी पहाटे 3 च्या सुमारास झालेला तो फोन त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला. त्यानंतर काही तासांनी घडलेल्या या दुर्घटनेत त्यांचा जीव गेला आणि सगळेच हादरले. मंगळवारी हेरंब यांच्या कंपनीकडून त्यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करून त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. ही बातमी कळताच करमरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबासाठी आधार असलेला, आपल्या कर्तव्यावर असलेला हेरंब आता कायमचा दूर गेला.
लवकरच घरी येणार होते पण..
गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हेरंब हे समुद्रात, नौकेवर कर्तव्य बजावत होते. कुटुंबियांशी ते नेहमी फोनवरून संवाद साधायचे. लवकरच त्यांचा समुद्रातला प्रवास संपणार होता आणि काहीच दिवसांत ते पुण्यात घरी, सुट्टीवर येणार होते, कुटुंबियांना भेटणार होते. पण त्या आधीच कुटुंबियांना, त्यांच्या मित्रांना हेरंब यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्याच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला असून, त्यांच्या आणि नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रूंना खळ नाहीये, अशी माहिती एका निकटवर्तीयाने साश्रूनयनांनी दिली.