HSC SSC Exam Date Declared : महत्त्वाची बातमी! दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शिक्षण विभागाने या परीक्षा नेमक्या कधी होणार हे सांगितले आहे.

HSC SSC Exam Date Declared : महत्त्वाची बातमी! दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
hsc ssc result
Updated on: Oct 13, 2025 | 8:05 PM

SSC And SSC Exam Date : महाराष्ट्रात दरवर्षी हजारो विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देतात. ही दोन्ही शैक्षणिक वर्षे विद्यार्थ्याच्या भविष्याला कलाटणी देणारी असतात. त्यामुळेच या दोन्ही इयत्तांच्या परीक्षा कधी होणार? या परीक्षेचं वेळापत्रक काय असेल? याची उत्सुकता समस्त विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही असते. एकदा वेळापत्रक आणि परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या की विद्यार्थी अभ्यासाचे नियोजन चालू करतात. असे असतानाच आता शिक्षण विभागाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षीक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

परीक्षा नेमकी कधी होणार?

मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे.माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या ऑनलाईन परीक्षाही याच काळात होतील. तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या काळात इयत्ता दहावीची परीक्षा होणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा कधी होणार?

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होईल. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होईल.

वेळापत्रक एवढ्या लवकर का जाहीर केले जाते?

दरवर्षी हजारो विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसतात. या परीक्षांच्या नियोजनाचे वर्ष कित्येक महिन्यांआधीच करावे लागते. तांत्रिक बाबींची अडचण भासू नये तसेच परीक्षा केंद्रांचे नियोजन, उत्तर पत्रीकांचे नियोजन अशा सर्वच गोष्टी शिक्षण विभागाला पाहाव्या लागतात. यासह विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या तारखेनुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करता यावे, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यासाला लागावे, यामुळेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागण्याचे आवाहन

एकदा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शिक्षकांनाही शालेय पातळीवर आपले नियोजन करता येते. अभ्यासक्रम कसा शिकवायचा? त्यासाठीची तयारी काय असायला हवी? विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या कशा आणि कधी घ्यायच्या? याचे शाळांना नियोजन करणे सोपे होते. त्यामुळेदेखील या सर्व बाबींचा विचार करूनच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.