
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, येत्या दोन डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर त्यानंतर लगेचच राज्यात महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे, मात्र नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष वाढल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, त्याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, यावरून देखील शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
चार दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकत भाजपकडून उमेदवाराला पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत, मात्र त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रवींद्र चव्हाण यांच्या “३ तारखेपर्यंत युती सांभाळा” या वक्तव्याचा संदर्भ देत तटकरे म्हणाले की, “तीन तारखेनंतर काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देवेंद्र फडणवीसजी आणि NDAच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. हे सर्व मुरुड आणि संपूर्ण रायगडच्या विकासासाठीच आहे.” यानंतर त्यांनी अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं की, “आम्ही कधी सुरत–गुवाहाटी–गोवा असे गेलो नाहीत… आम्ही जे गेलो ते सरळ विकासासाठीच.” असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाला लगावला आहे. दरम्यान तटकरे यांच्या या विधानानंतर आता चर्चेला उधाणा आलं आहे.