Weather Update : देशातील या भागांवर मोठं संकट, हवामान खात्याचा पावसाबद्दलचा इशारा काय ? महाराष्ट्रात…
मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण द्वीपकल्पात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले. यामध्ये पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांचा समावेश आहे. महानदी, गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

संपूर्ण देश व्यापून टाकलेला मान्सून आता स्थिरावला असून देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. कुठे हवामान आल्हाददायक आहे, पण काही भागांत एवढा पाऊस पडलाय की त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलै महिन्याला नुकतीच सुरूवात झाली असून या महिन्यात भारतातील बहुतेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असे आता हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मध्य भारत, उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यांना पुराच्या धोक्यामुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
कमी पावसाची शक्यता कुठे ?
याशिवाय, आयएमडीने ईशान्येकडील मोठ्या भागात, पूर्व भारतातील अनेक भागात आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक भागात सरासरी कमाल तापमान हे सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, ईशान्य, वायव्य, पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात देशात सरासरी 28 सेमी पाऊस पडतो.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण द्वीपकल्पात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि तेलंगणाच्या लगतच्या भागात आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांचा समावेश आहे. “आम्ही गोदावरी, महानदी आणि कृष्णा यांसारख्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रांवर लक्ष ठेवून आहोत” असे नमूद केले.
या राज्यांमध्ये जास्त पावसाचा अंदाज
आमच्या मॉडेल्सवरून महानदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात, ज्यामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे, सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दिसून येते. या प्रदेशात इतर अनेक नद्या आहेत. आपण पावसाची गतिविधी आणि जलाशयांमधील पाण्याच्या पातळी यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. उत्तराखंड आणि हरियाणामध्येही चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. महापात्रा म्हणाले, “या प्रदेशात दिल्लीसह अनेक शहरे आणि गावे समाविष्ट आहेत. अनेक दक्षिणेकडील नद्या उत्तराखंडमधून उगम पावतात. या सर्व नदी पाणलोट क्षेत्रे, शहरे आणि गावांसाठी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे ” असं त्यांनी सांगितलं.
या प्रकारचा पाऊस सहसा तेव्हा पडतो जेव्हा मान्सून रेषा तिच्या सामान्य स्थितीपासून दक्षिणेकडे सरकते आणि अनेक कमी दाब प्रणाली तयार होतात. साधारणपणे जुलैमध्ये पाच कमी दाब प्रणाली तयार होतात आणि पश्चिम-वायव्य दिशेने सरकतात असं महापात्रा यांनी नमूद केलं.
जुलैमध्येही दमदार सरी
जुलैमध्येही दमदार सरी कोसळणार असून देशभरात 106 टक्के पाऊस शक्य आहे. जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायमच राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात 106 % पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे
1 जुलै रोजी जारी करण्यात आलेला इशारा :
पुढील 3 ते 4 तासांत ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुण्यातील घाट, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा इशारा IMD तर्फे देण्यात आला आहे.
अकोल्यात अतिवृष्टीचा इशारा
अकोला जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची तर काही ठिकाणी अतिवृष्टी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा हा अंदाज दिला आहे. अकोला आणि जवळील अर्थातच पश्चिम विदर्भात काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आजपासून 4 जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा जून महिन्यात 155.8 मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या 113.8 टक्के आहे. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण 139 मिमी होत. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत 100 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
नागरिकांनी वीज आणि पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये आणि या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे. पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये आणि जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेखाली बांधू नये. वीज चमकताना मोबाईल आणि वीज उपकरणे बंद ठेवावीत. वाहन विजेच्या खांबापासून दूर ठेवावे. वीज पडण्याची सूचना मिळविण्यासाठी दामिनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
