IMD Monsoon Update : राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, आयएमडीच्या नव्या अंदाजानं धाकधूक वाढली

गेले काही दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू होता, मात्र आता पावसाचा जोर ओसरला असून मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

IMD Monsoon Update : राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, आयएमडीच्या नव्या अंदाजानं धाकधूक वाढली
| Updated on: Jun 02, 2025 | 5:17 PM

यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे, सामान्यपणे सात जूनच्या आसपास राज्यात मान्सूनची एन्ट्री होत असते, मात्र यावर्षी 25 मे रोजीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं. म्हणजेच तब्बल 12 दिवस वेळेपूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला. मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर गेले पाच ते सहा दिवस राज्यात पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र आता राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आता मान्सूनबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे नवा अंदाज ?   

महाराष्ट्रात पावसानं उघडीप दिली आहे. मान्सूनच्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे, पुढील 5 ते 7 दिवस अशीच परिस्थिती असणार आहे, 10 ते 12 जूनपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामं हाती घेतली पाहिजेत, असं पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप  यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची चिंता वाढवली होती, यावर्षी वेधशाळेने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवला आहे, त्याप्रमाणे पाऊस हा जास्त होण्याची शक्यता आहे, राज्याच्या अनेक भागात 108 टक्क्यांहून अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. सध्या पीक पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी म्हटलं आहे.

राज्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता

यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, यंदा देशभरात 108 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस चांगला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या पेरणीची घाई करू नका, पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीला सुरुवात करा असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यात पाऊस थंडावला आहे, मात्र बारा जूनपासून पुन्हा एकदा पाऊस राज्यात जोर पकडण्याची शक्यता आहे.