Maharashtra Rain Update : तुफान वारा, पावसाच्या धारा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कोसळधारा, तुमच्या भागात कधी बरसणार? वाचा…

शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसतो आहे. सिंधुदुर्गमध्ये पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे, राज्यात इतर ठिकाणीही आता पाऊस परतणार आहे. कुठे कुठे आणि कधी होणार पाऊस?

Maharashtra Rain Update : तुफान वारा, पावसाच्या धारा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कोसळधारा, तुमच्या भागात कधी बरसणार? वाचा...
Maharashtra Rain Update
Image Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2026 | 7:02 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा संध्याकाळच्या सत्रात परतीच्या पावसाने झोडपून काढले. ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. सह्याद्रीपट्ट्यातील कुडाळ सावंतवाडी तालुक्याला या मुसळधार पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यामुळे काही भागातील विजपुरवठा खंडित झाला असून हवेत मात्र गारवा निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यात भातकापणी सुरू असून गेले दोन दिवस अचानक परतीचा पाऊस पडत असल्यामुळे कापलेले भात खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला वादळी वारा आणि पाऊस यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कापणीला आलेली भातशेती पाण्याखाली गेली आहे. तसेच अनेक भागात भातरोपे पडून मोठे नुकसान झाले झाले आहे. जिल्ह्यात भातशेती काही प्रमाणात चांगली असताना पाऊस झाल्याने भात भिजून वाया गेले असून त्याला कोंब फुटण्याची शक्यता आहे.

Loading...

याशिवाय कोल्हापुरात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने नारळाचं झाड वाहनांवर कोसळलं. झाड कोसळल्यामुळे चार चाकी वाहनासह एका दुचाकीचही झालं नुकसान. कोल्हापुरातल्या राजारामपुरीतील नव्या गल्लीतील घटना. झाड कोसळल्याच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.

एकीकडे राज्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे तब्बल दोन महिने कोरडे गेले. त्यामुळे आता बहुतांश भागांमध्ये शेतकऱ्यांची पिकं करपल्याची परिस्थिती आहे. राज्यात पिण्याच्या पाण्याचा आअणि जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या याच परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता एका बाजूला उन्हाचा तडाखा आणि दुसऱ्या बाजूला पाऊस कोसळतो आहे. आज सिंधूदुर्गातील मुसळधार झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या भातशेतीचं नुकसान झालं आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता हा पाऊस कोसळतो आहे. वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह हा पाऊस आल्याने उभी भातशेती आडवी झाली. शेतीपिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, आता बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने पुढील दोन आठवड्यांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. एवढच नाही तर आता महाराष्ट्रातही पाऊस परतणार आहे. २७, २८, २९ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस येणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. विदर्भ-मराठवाड्यालाही पुढील दोन दिवसांमध्ये पावसाचा अलर्ट दिला असून सोसाट्याचा वारादेखील येणार आहे.

मुंबई, नवी मुंबई ठाणे, पालघरमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहणार असल्याने नागरिकांनी बाहेर निघताना स्वतःची काळजी घ्यावी, छत्री बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us