
महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, राज्यात पावसाचं मोठं संकट निर्माण झालं आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढणार
भारतीय हवामान विभागाकडून पुढील 48 तास मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड, तसेच विदर्भात बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जालन्यात पावसाचा रेड अलर्ट
दरम्यान जालन्यात पुढील चार तास हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, पुढील चार ते पाच तास खूपच महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहान देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये तर शुक्रवारीच जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
शेतकऱ्यांचं नुकसान
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे, या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे.