Cyclone Shakti : महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून हाय अलर्ट

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं. आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सध्या महाराष्ट्रावर एक मोठं संकट घोंगावत आहे.

Cyclone Shakti : महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून हाय अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2025 | 7:43 PM

यंदा महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावून घेतला. एवढंच नाही तर नद्यांचं पाणी घरादारात शिरल्यानं अनेकांचे संसार देखील पाण्यासोबत वाहून गेले. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसानं थोडी उघडीप दिली आहे. मात्र पुन्हा एकदा एक मोठं संकट आता महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाचा (Cyclone Shakti) धोका निर्माण झाला आहे.  या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48  तासांमध्ये या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.  कोकण किनारपट्टी आणि मुंबईला या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

हे वादळ सध्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्या तरी या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम हा कोकण किनारपट्टीवर दिसून आलेला नाहीये, मात्र  खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 किमी पर्यंत राहण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार

दरम्यान चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजाचां कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे.

मासेमारी थंडावली  

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात जाणं टाळलं आहे. हवामान खात्याकडून देखील मच्छिमारांना पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  खोल समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्यामुळे, मत्स्य विभाग देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.