
यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सूनचं प्रमाण चांगलं राहीलं, सरासरीपेक्षा अधिक मान्सूनचा पाऊस झाल्यामुळे काही राज्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका देखील बसला, पंजाब आणि महाराष्ट्रात तर अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. खरीप हंगाम हातचा गेला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे घरं देखील वाहून गेली. दरम्यान आता पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. सध्या देशात काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे तर काही भागांमध्ये पावसाचं सावट असल्यानं वातावरणात उष्णता निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस भारतीय हवामान विभाग (IMD) कडून अनेक राज्यांना जोरदार पवासाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.
काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज
देशात अंदमान निकोबारनंतर मान्सूनने केरळमध्ये एन्ट्री केली होती, तेव्हापासून केरळमध्ये पाऊस सुरूच आहे. केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दमदार झाला, त्यानंतर आता आधून-मधून अवकाळी पाऊस देखील सुरूच आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून केरळमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस केरळसाठी धोक्याचे असून जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे तामिळनाडू मध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू सोबतच हवामान विभागाकडून राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबर, आणि कराईकलमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती
दरम्यान बुधवारी मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे तापमानात देखील काही अंशी वाढ झाली आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे. परंतु पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट पहायला मिळणार असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.