मोठी बातमी! आज होणार फैसला, राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी, मुख्यमंत्र्यांसह…

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैर पदाकरिता रस्सीखेच बघायला मिळत आहे. महापाैर आरक्षण सोडत निघाली असून अनेक दिग्गजांच्या आशेवर पाणी फिरल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आज महत्वाची बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत होणार आहे.

मोठी बातमी! आज होणार फैसला, राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी, मुख्यमंत्र्यांसह...
Eknath Shinde and Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Jan 25, 2026 | 7:48 AM

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. नंबर 2 चा पक्ष शिवसेना शिंदे गट ठरला. मात्र, अजित पवारांच्या पक्षाला समाधानकारक कामगिरी या निवडणुकीत करता आली नाही. महापाैर आरक्षण सोडत देखील काढण्यात आली. मात्र, असे असतानाही महापाैर पदाचा तिढा अजून काही सुटलेला नाही. मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोबिंवली या महापालिकांवर युतीचा महापाैर होणार असे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात आले. आज याबाबतच सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होईल. त्याच बैठकीत महापाैर पदासोबतच अनेक पदांवर निर्णय होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामुळे महापालिकांतील सत्तावाटप रखडले होते, फडणवीस मुंबईत परतल्याने हालचालींना वेग आला.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिकांबाबत एकत्रित निर्णय होण्याची शक्यता आहे.  मुंबई मनपात शिवसेना (शिंदे गट) ला सन्मानपूर्वक पदे हवीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षामुळे शिंदे गटाकडून महत्वाची पदे मागितली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमहापौर, स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती अध्यक्षपदांची शिवसेनेला अपेक्षा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत. मात्र, बहुमतासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज असणार आहे. शिवसेनेच्या 29 जागा असल्या तरी सत्तेत मोठा वाटा मिळावा, अशी ठाम भूमिका त्यांची आहे. कारण एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की, आपल्या मदतीशिवाय भाजपा मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करू शकणार नाही.

भाजपने मुख्यमंत्रिपद शिंदेंना दिल्याने महापौरपद देण्यास हरकत नसल्याचा सूर देखील आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आजच्या बैठकीत नक्की काय होते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. दोन्ही बाजूंनी सांगितले जात आहे की, महापाैर हा युतीचाच होणार आहे.