नंदूरबार जिल्ह्यात बोगस डॉक्टर करतोय आदिवासींवर बिनधास्त उपचार, प्रशासनाचे दुर्लक्ष
राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. या भागात एक बारावी शिक्षण झालेला तरुण आदिवासींवर बिनधास्त उपचार करत असल्याचे उघडकीस आले आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इथे गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेत एका बोगस डॉक्टरने आदिवासींच्या जीवाशी खेळ मांडला आहे. ना कोणती पदवी, ना कोणता परवाना, केवळ १२ वीपर्यंत शिक्षण असलेला एक तरुण स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत सातपुड्याच्या दुर्गम भागात आपला धंदा चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.
सातपुड्याचा दुर्गम डोंगरऱ्यांचा भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील गुंडाचापडा परिसरात सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. याच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एका बोगस दवाखान्याचा कारभार बिनबोभाट सुरू होता. पश्चिम बंगालच्या कोलकात्याहून आलेला हा बंगाली डॉक्टर आदिवासी बांधवांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांच्या आयुष्याशी खेळत होता.
या तथाकथित डॉक्टरचे नाव आहे विचित्र बाबू मंडल असे आहे. हाताशी कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हा पठ्ठ्या बिनधास्तपणे स्टेथोस्कोप लावून रुग्णांची तपासणी करायचा आणि त्यांना थेट औषधांचे डोस लिहून द्यायचा. धक्कादायक बाब म्हणजे, हा बोगस डॉक्टर स्वतःच मान्य करतोय की तो १२ वी पास आहे. मात्र, तरीही तो रुग्णांना हाय-डोस औषधे तयार करून देत होता. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून दुर्गम भागात त्याचा हा गोरखधंदा सुरू होता. शासनाने दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी भागात असा बोगस डॉक्टरांनी आपले दुकान थाटले असून आदिवासींच्या जीवाशी त्यांचा खेळ सुरु आहे.
आरोग्य विभागाचे मोठे दुर्लक्ष
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात असे विचित्र डॉक्टर फोफावले आहेत. आता या बोगस डॉक्टरची कबुली तर समोर आली आहे, पण यावर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.