नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून कसून तपासणी, 59 ठिकाणी थेट कारवाई

नव्या वर्षाचा उत्साह लोकांमध्ये प्रचंड बघायला मिळतो. प्रशासनाकडूनही नव्या वर्षाची जय्यत तयारी केली जात आहे. सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यात येतंय. नव्या वर्षाच्या उत्साहाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याकरिता कसून तपासणी केली जात आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून कसून तपासणी, 59 ठिकाणी थेट कारवाई
Mumbai Municipal Corporation
| Updated on: Dec 28, 2025 | 8:53 AM

थर्टी फर्स्ट म्हटले की, लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. मुंबईसह गोव्यात थर्टी फर्स्टचे खास सेलिब्रेशन केले जाते. मुंबईमध्ये काही ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. नव्या वर्षाचा उत्साह लोकांमध्ये प्रचंड बघायला मिळतो. प्रशासनाकडूनही नव्या वर्षाची जय्यत तयारी केली जात आहे. सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्यात येतंय. नव्या वर्षाच्या उत्साहाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. महापालिकेकडूनही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी काही तपासण्या केल्या जात आहेत. थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईत गेल्या पाच दिवसांत तब्बल 1 हजार 221 हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पब आणि आस्थापनांमधील अग्निसुरक्षेची तपासणी केली.

यामध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्यामुळे 59 ठिकाणी कारवाई करण्यात आली तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आली. थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रेस्टॉरंट, बार आणि आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टीचे आयोजन करण्यात येते. मात्र, अतिउत्साहात आणि अग्निशमन यंत्रणा नसल्यास या ठिकाणी दुर्दैवाने आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते.

त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार अग्निशमन दलाच्या माध्यमातून मुंबईत 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत विशेष अग्निसुरक्षा तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असलेल्या ठिकाणी कारवाई करताना बेकायदा सिलिंडर जप्त करणे, नोटीस बजावणे, अतिरिक्त बांधकाम असल्यास नोटीस देणे आदी प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. अजूनही पालिका कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई सुरू आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पब यांची कसून तपासणी केली जात आहे. मुंबईत हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि पबमध्ये नवीन वर्षांच्या पार्ट्यांचे खास सेलिब्रेशन ठेवले जाते. नवीन वर्षाचे खास पद्धतीने स्वागत करण्यासाठी लोकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात आणि महागडी तिकिटे खरेदी करतात. मुंबईकरांसाठी नवीन वर्षाचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता रात्री उशिरा विशेष लोकलही धावतात. प्रशासनाकडून सध्या सर्व नियोजन केले जात आहे.