
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच जीएसटी परिषदेच्या 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात आता 12 टक्के आणि 28 टक्के हा जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. या निर्णयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या सुधारणांना जीएसटी 2.0 असे संबोधले आहे. यामुळे देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान अधिक सोपे होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक सुधार आहे. आता पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी आणि पराठा यांसारख्या वस्तू आता शून्य जीएसटी स्लॅबमध्ये आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता जीएसटीचे फक्त दोनच दर असतील. 5 टक्के आणि 18 टक्के हे नवीन दर 22 सप्टेंबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
या बदलामुळे पनीर, शॅम्पू आणि अनेक इतर दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होतील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान जीएसटी बदल करण्याचे वचन दिले होते. दिवाळी आणि छठ पूजेपूर्वी नागरिकांना आनंदाचा डबल धमाका मिळेल, असे मोदींनी सांगितले होते. आता हा घेतलेला निर्णय त्याच दिशेने एक पाऊल आहे, असे म्हटले जाते आहे.
“काँग्रेसच्या काळात टॉफीवरही टॅक्स होता. काँग्रेसच्या काळात १०० रुपयांवर २५ रुपये टॅक्स द्यावा लागत होता. काँग्रेस टॉफीवर २१ टक्के टॅक्स आकारत होती. सायकलवर १७ टक्के कर लागत होता. काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांना घर बांधणेही कठीण झाले होते. 2014 मध्ये त्यांचे सरकार येण्यापूर्वी स्वयंपाकघरातील वस्तू, शेतीची उपकरणे, औषधे आणि अगदी जीवन विम्यावरही काँग्रेस सरकार विविध प्रकारचे कर आकारत असे. 100 रुपयांच्या वस्तूवर 20-25 रुपये कर लागत होता. पण आमच्या सरकारचा उद्देश सामान्य लोकांच्या जीवनात बचत व्हावी आणि त्यांचे जीवनमान सुधारावे हा आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुधारणांचा हा सिलसिला थांबणार नाही. आत्मनिर्भरता ही फक्त घोषणा नाही, तर त्या दिशेने ठोस प्रयत्न होत आहेत. जीएसटी 2.0 हा देशासाठी सपोर्ट आणि वाढीचा डबल डोस आहे. या नवीन सुधारणांमुळे देशातील प्रत्येक कुटुंबाला मोठा फायदा होईल. यंदाची धनत्रयोदशी अधिक आनंददायी असेल, कारण अनेक वस्तूंवरील कर आता खूप कमी झाला आहे. 8 वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला, तेव्हा अनेक दशकांचे स्वप्न साकार झाले. हा स्वतंत्र भारताच्या सर्वात मोठ्या आर्थिक सुधारणांपैकी एक होता”, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.