
कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात बघायला मिळतंय. गेल्या काही दिवपांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. राज्यात तापमानात सातत्याने चढउतार बघायला मिळतोय. तापमान अचानक खाली जात आहे तर कधी वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहिल. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे थंडी कमी झाली आणि तापमान वाढले. उत्तरेकडील राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. पारा सातत्याने खाली जात आहे. उत्तरेकडील वाढलेली थंडी बघता राज्यातही थंडीची लाट येऊ शकते. आज अनेक भागात ढगाळ वातावरण राहिले. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचाही अंदाज आहे. दुपारनंतर अनेक भागात सध्या ढगाळ वातावरण दिसतंय. थंडीसोबत वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे.
हवामान विभागाने 12 जानेवारीसाठी एक मोठा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 4 राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 50 किमी प्रति तास वेगाचे जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे. उत्तर भारतातील 17 शहरांसाठी थंडीच्या लाटेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि कर्नाटकसाठी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा जारी हवामान विभागाने दिला.
पुढील दोन दिवसात पुणे शहरातील थंडी ओसरणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून शहरातील किमान तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली आहे. त्यामुळे हुडहुडी कायम आहे. मात्र पुढील दोन ते तीन दिवसात हवामानात बदल होणार असून किमान तापमान वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरामध्ये 9.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमान होते. परभणी येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर येथे 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, पुणे, मालेगावर भंडारा, नाशिक, गोदिंया येथे 10 अंश सेल्सिअस तापमान जळपास होते. थंडीची लाट राज्यातील काही भागात तीव्र होणार असल्याचे सांगितले जात आहे.