इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नात संस्कृती जपली, महाराजांना ट्रोल करणारेही करतायेत विवाहसोहळ्यातील त्या गोष्टीचं तोंडभरून कौतुक
आज इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलप यांचा विवाहसोहळ्या संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे कायमच चर्चेत असतात. त्यांचं किर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी होते. काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीच्या साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून ते चांगलेच चर्चेमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. महाराज फक्त कीर्तनातून लोकांना लग्न साधेपणाने करा, जास्त खर्च करू नका, असे सल्ले देतात परंतु मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात एवढा खर्च का केला अशी टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. दरम्यान आता इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. या शाही लग्न सोहळ्यावरून पुन्हा एकदा इंदोरीकर महाराज यांच्यावर टीका सुरू झाली आहे. मात्र यावेळी या लग्न सोहळ्यात बोलताना महाराजांनी आपल्या ट्रोलर्संला सणसनीत उत्तर दिलं आहे.
इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पाडला आहे. या लग्नासाठी त्यांनी प्रचंड खर्च केला. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतात काही कमी राहु नये, याची खास काळजी यावेळी स्वत: इंदोरीकर महाराजांनी घेतली होती. तब्बल 100 एकर जागेत हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र यावेळी साखर पुड्यापेक्षाही लग्नावर जास्त खर्च झाल्यानं पुन्हा एकदा महाराजांवर टीका सुरू झाली आहे.
परंतु दुसरीकडे इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीच्या लग्नात जे जेवणाचे पदार्थ ठेवले होते. त्यावरून त्यांचे टीकाकार देखील त्यांच कौतुक करत आहेत. महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नात मराठी संस्कृती जपली आहे. त्यांनी मुलीच्या लग्नात खास मराठमोळं जेवणं ठेवलं होतं. मी माझ्या मुलीच्या लग्नात गुलाब जामून किंवा मठ्ठा ठेवला नाही असं महाराजांनी स्वत: यावेळी सांगितलं.