काम न केल्यास थेट हत्या, माझ्यासमोरच एकाला संपवलं; बीडचा तरुण थायलंडच्या ‘गोल्डन ट्रँगल’मध्ये अडकला, मित्राकडे केले धक्कादायक खुलासे
thailand job scam : थायलंडमधून हादरवणारा प्रकार समोर आला आहे. थायलंड-म्यानमारच्या सीमेवर भारताच्या 800 तरुणांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाइन फसवणुकीचे कामे करून घेतली जात आहेत.

म्यानमार-थायलंड-लाओस सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरातील धक्कादायक प्रकाराने संपूर्ण देश हादरला आहे. भारतातील तब्बल 800 तरुण अडकल्याने सर्वांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत. तर महाराष्ट्रातील २५ जण या प्रकरणात अडकले असून त्यांना ओलिस ठेवण्यात आलं आहे. ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरात बेकायदेशीररित्या ऑनलाइन फसवणुकीचे कामे करून घेतली जात आहेत. काम न केल्यास थेट हत्या करत असल्याचा धक्कादायक खुलासा बीडच्या तरुणाने मित्राकडे फोनवर केला आहे. बीडच्या तरुणाने सांगितलेल्या माहितीनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
बीडमधील एक तरुण देखील ४ जूनपासून तिथेच आहे. या तरुणाचं ॲनिमेशन झालं आहे. त्यामुळे तो ऑनलाईन नोकरी शोधत होता. बीडमधील तरुण हा ऑनलाइन जाहिरीतीच्या मार्गातून म्यानमारला पोहोचला. या धक्कादायक प्रकारानंतर त्याने बीडमधील एका मित्राशी संपर्क करून सर्व प्रसंग सांगितला. त्याच्यासोबत महाराष्ट्रासह इतर राज्यातील तरुण असल्याचं त्याने फोन कॉलमध्ये सांगितलं. तर काही जणांची हत्या देखील झाल्याची धक्कादायक बाब त्याने मित्राला सांगितली आहे. या प्रकरणात बीडच्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास देखील सुरू आहे.
बीडच्या तरुणाने मित्राकडे काय खुलासे केले?
म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या बीडच्या तरुणाने मित्राला सांगितलं की, आम्ही 500 ते 600 तरुण अडकलो आहोत. मी घरी बसलो होतो, व्हाट्सअॅपवर एक मेसेज आला. त्यात मी अॅनिमेशन डिझायनर आहे. जाहिरातीत सोशल मीडिया हाताळण्याचे बँकॉकमध्ये काम असल्याचे सांगितले. त्यानंतर मी बँकॉकला पोहोचलो. इकडे आल्यानंतर मला घ्यायला एक गाडी आली’.
‘कारमध्ये बसल्यानंतर एकाने माझ्या डोक्याला बंदूक लावली. त्यानंतर कागदपत्रे काढून घेण्यात आली. पुढे जंगल-झुडपातून बँकॉकमधून बेकायदेशीररित्या म्यानमारमध्ये आणलं. म्यानमारमध्ये ऑनलाइन फसवणुकीचे कामे करायला सांगत आहेत. काम केलं नाही तर मारहाण करतात. जेवण देत नाहीत. बिहारच्या तरुणाची हत्या देखील केली आहे. महाराष्ट्रातील 20-30 जण असतील. काम नाही केलं तर थेट हत्या केली जाते. आम्हाला १० मिनिटे मोबाइल दिला जातो. आम्हाला म्यानमारला बेकायदेशीररित्या आणलं गेलं आहे, असे धक्कादायक खुलासे तरुणाने केले.
पीडित व्यक्तीच्या मित्राने काय सांगितलं?
म्यानमार-थायलंडमधील या धक्कादायक प्रकारावर बीडमधील पीडित व्यक्तीच्या मित्राने सांगितलं की, ‘मी राजकारणात सक्रिय असल्याने मित्राने मला व्हॉट्सअॅपवर मदतीसाठी मेसेज केला. त्यानंतर त्याने व्हाट्सअॅप व्हॉइस कॉल करून तेथील संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि मदतीची मागणी केली. त्याला नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करून नेले, म्यानमार थायलंडच्या सीमाभागात बेकायदेशीरपणे नेले. ऑनलाइन फसवणुकीचे कामे करून घेतली जातात. काम न केल्याने बंदुकीचा धाक दाखवला जातो. तीन तरुणांची काम न केल्याने हत्या करण्यात आली, अशी त्याने मला फोनवरून माहिती दिली. यानंतर मी त्याच्या कुटुंबीयांना धीर देऊन पोलिसांत घेऊन गेलो. आता सायबर पोलिसात तक्रार दिली असून पोलीस अधीक्षकांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्र व्यवहार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आमची मागणी आहे की, सर्वांना सुखरूप आणण्यासाठी मदत करावी’.
