तिला प्रॉब्लेम होतोय गुडबाय…; तरुण विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, शेवटची पोस्ट चर्चेत

जळगावात आयटीआयच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने शासकीय वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रोहित पवार याने सोशल मीडियावर 'गुडबाय' स्टेटस ठेवले होते.

तिला प्रॉब्लेम होतोय गुडबाय...; तरुण विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, शेवटची पोस्ट चर्चेत
jalgaon student death
| Updated on: Mar 18, 2026 | 12:32 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तरुण पिढीच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) वसतिगृहात एका १८ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर गुडबाय असे स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित समाधान पवार (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो धरणगावातील निंभोरा या गावात राहत होता. रोहित हा जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये ‘मशिनिस्ट’ ट्रेडच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो एमआयडीसी परिसरातील शासकीय वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८ मध्ये आपल्या तीन मित्रांसोबत राहायचा.

बुधवारी त्याचे इतर रूममेट्स काही कामानिमित्त बाहेर गेले होते. खोलीत एकटाच असलेल्या रोहितने मफलर आणि टॉवेलच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतला. त्याचे मित्र परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीने त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय?

रोहितने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, “हॅलो मित्रांनो, मी माझा आयडी बंद करत आहे… कारण तिला प्रॉब्लेम होत आहे. तरी कोणीही मेसेज करु नका. कोणाला काही वाईट मेसेज आले तर मला माफ करा. गुडबाय, इन्स्टाग्राम फॅमिली, असे रोहितने म्हटले होते. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

अकस्मात मृत्यूची नोंद

रोहित हा मनमिळावू स्वभावाचा होता, असे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या मानसिक तणावातून किंवा कारणावरून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यातील त्याच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us