भाजप अन् शिंदे गटात नाराजीनाट्य, खासदाराने व्यक्त केली जाहीरपणे खंत
भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत जळगाव जिल्ह्यात नाराजीनाट्य सुरु झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका सुरु आहे. हाच धडाका नाराजीनाट्याचे कारण आहे. भाजप खासदारने ही नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे सरकार येऊन आता नऊ महिने झाले. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आहेत. अधूनमधून दोन्ही पक्षात नाराजीच्या बातम्या येतात. परंतु जाहीरपणे नाराजी व्यक्त होत नाही. आता मात्र भाजप खासदाराने शिंदे सरकारच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे युतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजप खासदारने शिवसेनेच्या मंत्र्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
नेमके काय घडले
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लावला आहे. मात्र या कार्यक्रमांना जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व खासदारांना बोलवले जात नाही. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
योजनेत केंद्राचा वाटा
जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आली आहे. या योजनेसाठी केंद्राने बजेट दिले आहे. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र येईल, अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की. जलजीवन मिशन योजनेचे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा आहे.
शिवसेनेवर होत असलेले खोके, ओके वगैरे आरोप दूर करायचे असेल व खरोखर चांगलं काम दाखवावे लागणार आहे. कामाच्या माध्यमातून आरोप दूर करता येईल, असे उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
समन्वयक आहेत कुठे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षात समन्वयासाठी समन्वयक नेमला होता. शिंदे गट आणि भाजपमधील समन्वयासाठी आशिष कुलकर्णी (ashish kulkarni) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली होती. दोन्ही गटातील आमदार आणि मंत्र्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचं आणि शिंदे गटातील आमदारांच्या समस्या सोडवण्याचं काम कुलकर्णी यांच्याकडे दिले होते. परंतु दोन्ही गटात नाराजी असताना समन्वय होत आहे की नाही, हे समजू शकले नाही.
