जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी खेळी, कुणाला उमेदवारी देणार?

| Updated on: Mar 09, 2024 | 9:54 PM

जळगाव लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता असून नव्या चेहऱ्याला यंदा संधी मिळण्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी खेळी, कुणाला उमेदवारी देणार?
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 9 मार्च 2024 : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने रोहित निकम यांना जळगाव लोकसभेची लॉटरी लागणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दिल्लीत भाजपच्या अंतर्गत गटात मोठी खलबत सुरु असून रोहित निकम यांचा नावाचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित निकम हे मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित निकम यांच्या पाठोपाठ जळगाव लोकसभेसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले जाणार असल्याची शक्यता असून नव्या चेहऱ्याला यंदा संधी मिळण्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू आहे. यात इच्छुक उमेदवारांमध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रोहित निकम यांना मोठा राजकीय वारसा

रोहित निकम यांना मोठा राजकीय वारसा सुद्धा आहेत . त्यांच्या मातोश्री शैलजा निकम या जिल्हा बँकेचा संचालक आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर दुसरीकडे रोहित निकम हे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे देखील आहेत. त्यामुळे रोहित निकम यांच्या पाठीमागे त्यांचं वेगळं सामाजिक राजकीय वलय आहे.

रोहित निकम हे स्वतः जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या संचालक आहेत. ते जिल्हा दूध संघाचे देखील संचालक आहेत. सध्या रोहित निकम जळगाव लोकसभेचे भाजपचे बुथ संयोजक म्हणून काम पाहत आहेत. जळगाव जिल्ह्यात रोहित निकम यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने रोहित निकम यांना जळगाव लोकसभेची लॉटरी लागणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.