Gulbrao Patil: तरुणांना राग आला तरी चालेल…निवडणुका आता चार वर्षांनी; ‘बिहारी’वरून गुलाबराव पाटलांनी काय सुनावलं

Gulbrao Patil Over Bihar: मुंबईत बिहार भवनावरून वाद पेटलेला आहे. तर दुसरीकडे बिहारी माणसांचे लोढे राज्यातील विविध शहरात रोजगारासाठी धडकत आहेत. बिहारीवरून वाद पेटत असतानाच शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रीयन तरुणाईला चांगलेच सुनावले आहे. तर पाटलांना बिहारींचा पुळका का आला असा सवालही केल्या जात आहे.

Gulbrao Patil: तरुणांना राग आला तरी चालेल...निवडणुका आता चार वर्षांनी; बिहारीवरून गुलाबराव पाटलांनी काय सुनावलं
गुलाबराव पाटील, बिहारी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 24, 2026 | 1:11 PM

किशोर पाटील/ प्रतिनिधी: मुंबईत बिहार भवन उभारण्याला मनसेचा विरोध आहे. त्यावरून वातावरण तापले आहे. तर बिहारी रोजगारानिमित्त आता ग्रामीण महाराष्ट्रातही दिसू लागले आहे. एकीकडे राज्यात रोजगार कमी झाल्याची ओरड होत असताना मग बिहारी लोक रोजगारासाठी राज्यात का येत आहेत, असा सवालही विचारल्या जात आहे. बिहारीवरून वाद पेटत असतानाच एकनाथ शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील तरुणाईला चांगलेच सुनावले आहे. तर पाटलांना (Gulbrao Patil Over Bihar) बिहारींचा पुळका आताच का आला असा ही सूर उमटत आहे.

नोकरी करण्याची तरुणाईची मानसिकता नाही

राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. नोकरी करणारी मानसिकता आता आपल्या तरुणाईकडे नाही. बिहारी माणूस या ठिकाणी पोट भरतो आणि आपण बिहारीवर टीका करतो. कशाला टीका करता मग असा सवाल त्यांनी केला. काम करण्याची वृत्ती आपल्या तरुणांमध्ये उरली नसल्याचा दावा त्यांनी केला. तरुणांना राग आला तर आला कारण आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा बघू असा टोला मारताच सभेत एकच खसखस पिकली.

आपण नुसत्या गप्पा करतो की अंबानी असे मोठे झाले. शून्यातून कसे मोठे झाले या चर्चा आपण करतो. तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही पण प्रयत्न करू बघा. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगार संदर्भात बेरोजगारी संदर्भात भाष्य करत तरुणांना सल्ला दिला आहे. मी काय राजकारणी होतो का? मात्र आता आमच्या धंद्यात पण आम्ही श्रेष्ठ आहोत. प्रत्येक गोष्टींमध्ये नैपुण्य दाखवण्याची गरज आहे, असे म्हणतातच सभेत हश्या पिकला.

मी काही उधारी मागायला नाही आलो

जळगावच्या एमआयडीसीला डी प्लस चा दर्जा मिळावा यासाठी सात वर्षे लढलो. सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी आमचे उद्योग मंत्री देसाई होते. ते लक्ष देत नव्हते. माझ्याकडे बघायचे सुद्धा नाही. एक दिवशी त्यांना पक्षाच्या बैठकीत डायरेक्ट बोललो की आमच्याकडे पाहत तर चला. मी काही तुमच्याकडे उधारी मागायला नाही आलोय. स्पष्टपणे बोललो. पण तरीही त्यांनी आमचं काम काही केलं नाही. अखेर हा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. या मुद्यावरून बैठकीत अनेकदा वाद झाला. आमच्या आजूबाजूला सर्व जिल्ह्यांना एमआयडीसी मध्ये दर्जा होता मग आम्हाला का नाही आम्ही का दुसऱ्याचे लेकरं होतो का या शब्दात बोललो, असे पाटील म्हणाले. जळगाव एमआयडीसी ला डी प्लस चा दर्जा मिळवून देण्यासाठीचे कसे प्रयत्न केले याचा किस्सा सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका केली. छोटे छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील त्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या केळीवर आधारित देखील उद्योगांची मोठी गरज आहे.

गिरीश महाजन-मंगेश चव्हाणांना टोला

राज्यातल्या सर्व अंगणवाड्यांमधील पोषण आहारात केळीचा समावेश करा याबद्दलची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे देखील यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. जळगावचा कोको कोला कंपनी जामनेर मध्ये गेला यावरून देखील गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता गिरीश महाजन, तसेच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना टोला लगावला जळगाव मध्ये येणारी कोको कोला कंपनी जामनेर मध्ये गेली आणि जामनेर चाळीसगाव मध्ये गेले. आपण आमदार आहेत की नाही हे बघावं लागेल आपल्याला? या शब्दात गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. पुढच्या वेळी दौरा काढावा लागेल आणि मी देखील कोट घालून जाईल असं मिश्किल वक्तव्य करत नाम न घेता गुलाबराव पाटलांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना टोला लगावला. दावोस येथे चाळीसगावसाठी 15 हजार कोटींच्या प्रकल्प बाबत मुख्यमंत्र्यांनी करार केला त्यावरून गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली.