तर मी फाशी घेईल… जरागेंसमोर आशिमा मित्तलच्या वक्तव्याने अंतरावली सराटीत सर्वच अवाक
Manoj Jarange Patil and Collector Ashima Mittal : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचले. मात्र, यादरम्यान असे काही घडले की, सर्वांनाच धक्का बसला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. आंतरवाली सराटीत हे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकारकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत. मात्र, जरांगे आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. हेच नाही तर 12 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मराठा समाजाच्या मुलांनी हळूहळू करून मुंबईकडे रवाना व्हावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या आहेत. आझाद मैदानावर कोणीही जाऊ नये, असे त्यांनी म्हटले. जरांगेंचे उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी जालनाचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जरांगे यांच्या भेटीला पोहोचल्या.
यादरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सरकारने नक्की काय काय केले, हे सांगताना दिसल्या. मात्र, ते मनोज जरांगे पाटील यांना पटले नाही. त्यांनी जरांगे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जरांगे यांनी विचारले की, तुम्ही सरकारची बाजू घ्यायला इथे आला आहात का? यावर मित्तल यांनी म्हटले की, ते माझे काम आहे. यावर जरांगे यांनी म्हटले की, सरकारमुळे चांगल्या चांगल्यांना फाशी घेण्याची वेळ आली..
सरकारवर टीका करताना त्यांनी हे बोलले. पण आशिमा मित्तल यांना त्याचा अर्थ बहुधा लक्षात आला नाही, त्यांना वाटले की, जरांगे हे आपल्याबद्दलच बोलत आहेत. मित्तल यांनी थेट म्हटले की, मनोजजी नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरीही माझी तयारी आहे. मित्तल यांचे हे बोलणे ऐकताच अंतरावाली सराटीत सर्वजण शांत झाले. मित्तल पुढे बोलत असतानाच जरांगे यांनी त्यांना थांबवले आणि बोलण्यास सुरूवात केली.
जरांगे यांनी म्हटले की, तुम्ही जिल्हाधिकारी आहात… तुम्ही फाशी घेण्याची भाषा बोलू नका. एक प्रश्न सोडवता आला नाही म्हणून तुमच्यावर टीका होईल. मी काय बोलतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही कशाला या भानगडीत पडत आहात. अभ्यास करून तुम्ही मोठी झालेली लेकरं आहात. सरकारमध्ये चाैथी नापास लोक मंत्री आहेत. ते लोक तुम्हाला शिकवून इकडे पाठवत आहेत. तुम्ही रात्रंदिवस अभ्यास करून इथपर्यंत पोहोचले आहात. तुमची युपीएससी आणि एमपीएससीची पुस्तके यांना वाचता येणार नाहीत.