Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची भेटीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्य

| Updated on: Sep 14, 2023 | 9:23 AM

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी गावात किती वाजता पोहोचणार? मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार का?. काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन आंदोलन स्थळी गेले होते.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची भेटीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्य
maratha reservation manoj jarange patil
Follow us on

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटी गावामध्ये आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा 17 वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची तयारी दाखवली होती. पण त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावं, अशी त्यांची मागणी होती. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी गावामध्ये येतील अशी चर्चा होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित होता. पण काही कारणामुळे येणं शक्य झालं नाही. आता आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी 11 च्या सुमारास ते आंतरवाली सराटी गावामध्ये दाखल होतील, अशी माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील उपोषण सोडतात का? याकडे आता लक्ष लागल आहे.

काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन आंदोलन स्थळी गेले होते. तिथे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तीन ते साडेतीन तास चर्चा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंतरवाली सराटी गावामध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन देणार? कुठली चिठ्ठी देणार? याकडे लक्ष असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, रावसाहेब दानवे आणि संदीपान भुमरे आंतरवाली सराटी गावामध्ये जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारकडे काही अटी ठेवल्या आहेत.

आज मार्ग निघेल अशी आशा

“आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक पाऊल उचलेल. आम्ही तिघांनी त्यांच्या टीम सोबत चर्चा केली” असं रावसाहेब दानवे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर म्हणाले. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी 30 दिवसांची मुदत मागितली आहे. सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मागच्या काही दिवसांपासून वाटाघाटी सुरु आहेत. पण अजून यावर तोडगा निघालेला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण आंदोनलावर मार्ग निघेल अशी अनेकांना आशा आहे. मराठा समाजावर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झालं. राज्यातील अनेक नेत्यांनी आंतरवाली सराटी गावी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.