Grampanchyat Election : प्रतिक्षा संपली… पहिल्या निवडणुकीचं बिगुल वाजणार, गावकरी लागले कामाला, कोणत्या पंचायतीचा बार उडणार?

Grampanchyat Election : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा फड आता गाजणार आहे. जिल्ह्या जिल्ह्यात प्रशासन तयारीला लागले आहे. प्रशासनाने आरक्षणाची सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.

Grampanchyat Election : प्रतिक्षा संपली... पहिल्या निवडणुकीचं बिगुल वाजणार, गावकरी लागले कामाला, कोणत्या पंचायतीचा बार उडणार?
ग्रामपंचायत निवडणुकीचा लवकरच बिगुल
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 12, 2025 | 11:52 AM

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता प्रशासन निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक तयारीला लागलेले आहे. त्यासाठीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. गाव कोणती राजकीय कूस बदलते याची खुमासदार चर्चा पारावर रंगल्या आहेत. ‘गावकरी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय लवकरच उमेदवारांना येणार आहे. गावात पाच वर्षानंतर निवडणुकीचा फड रंगणार आहे. तर गेल्या पाच वर्षांत सरपंच पदावरून उडालेला गोंधळ पुन्हा दिसणार का असा सवाल पण विचारल्या जात आहे.

रत्नागिरीत प्रशासनाची जय्यत तयारी

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी निघणार आहे. २०२५ ते २०३० पर्यत म्हणजे पाच वर्षासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघेल. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात निघणार सोडत, सोडत काढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचातय समितीच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने राजकीय दृष्य़ा ग्रामपंचायत निवडणुकांना सुद्धा महत्व आले आहे. २०२३ सालापासून ग्रामपंचातींच्या निवडणुका नाहीत, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दोन वर्षांचा बॅकलोग भरून निघणार असल्याने कार्यकर्ते सुद्धा आनंदात आहेत.

चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे १३० ग्रामपंचायती,संगमेश्वर तालुकयातील १२७ ग्रामपंचायती, खेड तालुक्यातील ११४, दापोली तालुक्यातील १०६, राजापूर तालुक्यातील १०१, रत्नागिरी तालुक्यातील ९४, गुहागर तालुक्यातील ६६,लांजा तालुक्यातील ६० तर मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना

जालना जिल्ह्यात 2025 ते 30 या कालावधीमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे. त्यामुळे येत्या 15 जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठ तहसीलदारांनी आरक्षित करण्यात आलेल्या गावांची नावे जाहीर करून प्रक्रिया राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एप्रिल महिन्यात सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली होती. मात्र ती रद्द केली असल्याने आता पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेल्या सरपंच आरक्षणामध्ये बदल होणार आहे. दरम्यान यावर्षी जिल्ह्यातील 438 ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या प्रवर्गाकडे असून 219 ठिकाणचं सरपंच पद हे महिलांच्या हाती असणार आहे.