“जे जे दिल्लीचे चपराशी, त्यांना पाण्यात…” संजय राऊत शिंदे सेनेवर तुटून पडले, म्हणाले ते तर अतिविशिष्ट…
Sanjay Raut criticized Shinde Sena : खासदार संजय राऊतांनी काल व्हिडिओ बॉम्ब टाकून राज्यात खळबळ उडवून दिली होती. शिंदे गोटातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. त्यानंतर आज राऊतांनी शिंदे सेनेचा खरपूस समाचार घेतला.

खासदार संजय राऊत यांनी काल व्हिडिओ बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. त्यात त्यांच्या जवळील काही बॅगेमध्ये नोटांची बंडलं असल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्याने एकच खळबळ उडाली होती. दिल्लीत शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी गेल्याचे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याचा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला होता. शिंदे गोटातून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. त्यानंतर आज राऊतांनी शिंदे सेनेचा खरपूस समाचार घेतला.
हा भाजपा सुरक्षा कायदा
काल पाशवी बहुमताच्या आधारे सरकारने जनसुरक्षा कायदा मंजूर करून घेतला. अनेक सामाजि संघटनांनी, बुद्धीजीवींनी या कायद्यातील तरतुदींविषयी चिंता केली आहे. आमचा पक्ष आणि विरोधकांचा या कायद्याला विरोध असल्याचे ते म्हणाले. आजही आदिवासी पाड्यांवर सोयी-सुविधा नाहीत. तिथे झोळीतून लोकांना, मातांना न्यावे लागते. त्यामुळे हा जनसुरक्षा कायदा नाही तर भाजपा सुरक्षा कायदा असल्याची प्रखर टीका त्यांनी केली.
सिगारेटचा झुरका, आक्षेपार्ह स्थिती आणि पैशांचा बॅगा
संजय शिरसाट हे कायदेशीर कारवाई करणार असल्याच्या प्रश्नावर राऊतांनी उत्तर दिले. शिरसाट यांच्या घरातील तो व्हिडिओ आहे. तो आपण काही चोरून शूट केलेला नाही. त्यामुळे ते आपल्यावर कायदेशीर कारवाई का करतील? असा प्रश्न राऊतांनी केला. एका आक्षेपार्ह व्हिडिओ अगोदरच प्रसिद्ध झाला होता. त्यात राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत, बाजूला उघड्या बॅगांमध्ये पैसा आहे. काही बॅगा उघड्या आहेत. काही बंद आहेत, काही कपाटात आहेत. असा तो व्हिडिओ आहे. मग जनहितासाठी हा व्हिडिओ समोर आला असेल तर त्यात कोणाची बेअब्रू कशी झाली? त्यावर मंत्र्यांनी खुलासा दिलेला आहे. त्यांचा खुलासाही माध्यमांनी दिला आहे.
संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत. ते महात्मा आहेत, ते संत आहेत. त्यांच्या संतगिरीचे पुरावे कोणी समोर आणले असतील तर फडणवीस यांनी आमच्यावर कारवाईचे उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे. एक मंत्री सिगारेटचे झुरके मारत, आक्षेपार्ह स्थितीत पैशांच्या बॅगासह बसलेला आहे. हे चित्र आमचे नाही, ही महाराष्ट्राची प्रतिमा आहे. या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात किती घटीया दर्जाचे सरकार चालवलं जातंय, हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिले आहे.
जे जे दिल्लीचे चपराशी
एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हे राऊतांना संताजी-धनाजीप्रमाणे पाण्यात दिसत असल्याचा खोचक टोला शिंदे गोटातून लगावण्यात आला होता. त्याला राऊतांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की हो, आम्ही अशा मंत्र्यांना, नेत्यांना पाण्यात पाहतो. जे जे दिल्लीचे चपराशी आहेत. त्यांना आम्ही पाण्यात पाहतो. त्यांना आम्ही पाण्याच्या तळाशी नेणार आहोत, अशी टीका राऊतांनी केली.
