
ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीसाठी आलेल्या काही महिलांना रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करून घेता येणार नाही असे सांगत प्रवेश नाकारला. यामुळे मोठी खळबळ उडाली. प्रसूतीगृहातील खाटांची क्षमता संपल्यामुळे हा प्रकार घडला. यामुळे गरोदर महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कळवा रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात केवळ २५ खाटांची अधिकृत क्षमता आहे. मात्र, शनिवारी २५ ऑक्टोबरला याठिकाणी ३२ हून अधिक महिला आधीच दाखल होत्या, तर आणखी आठ महिला प्रसूतीच्या प्रतीक्षेत होत्या. यामुळे रुग्णालयाची क्षमता पूर्णपणे ओलांडली गेली होती. खाटांची उपलब्धता नसल्याने डॉक्टरांना नवीन आलेल्या गरोदर महिलांना रुग्णालयात दाखल करून घेणे शक्य नाही, असे सांगितले. त्यामुळे या रुग्णांना प्रवेश नाकारण्यात आला.
या प्रवेश नाकारलेल्या महिलांना डॉक्टरांनी थेट ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना ऐनवेळी दुसऱ्या रुग्णालयात जावे लागल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी धावपळ झाली. रुग्णालयाच्या या भूमिकेमुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे ५०० खाटांच्या या कळवा रुग्णालयात केवळ ठाणे शहरच नव्हे, तर भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यामुळे रुग्णालयावर सातत्याने मोठा भार असतो. अपुऱ्या सोयीसुविधा, खाटांची कमतरता आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आरोग्य सेवांवर ताण पडतो. या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांनी स्पष्ट केले की, ठाणे आणि आसपासच्या शहरांमधून अनेकदा शस्त्रक्रिया झालेल्या महिलांनाही कळवा रुग्णालयात पाठवले जाते. ज्यामुळे रुग्णांचा भार वाढतो आणि उपचार करणे कठीण होते. अशा परिस्थितीत महिलांना रुग्णवाहिकेमार्फत दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागते.
दरम्यान कळवा रुग्णालयातील सोयीसुविधांचा अभाव आणि क्षमतेपेक्षा जास्त रुग्णभार हाताळण्याची अडचण या गंभीर समस्या या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावलं उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.