
ॲप-आधारित रिपिडो (Repido) बाईक टॅक्सी सेवेतून प्रवास करणाऱ्या एका तरुणीला कल्याणमध्ये निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची आणि चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने प्रसंगावधान राखून प्रतिकार करत चालत्या बाईकवरून उडी मारल्याने ही घटना समोर आली. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (१९) याला अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे बाईक टॅक्सी सेवांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कल्याण महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. पीडित तरुणी जिमसाठी एका नामांकित ॲपद्वारे बाईक टॅक्सी बुक करून प्रवास करत होती. आरोपीने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र प्रवासाचा मेसेज आला नसल्याने तरुणीने ओटीपी विचारला. या दरम्यान, सिंधीगेट चौकाच्या दिशेने जात असताना आरोपी बाईकचालक सिद्धेश परदेशी याने अचानक बाईक निर्जन भागातील एका पडक्या इमारतीकडे वळवली.
चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तरुणीने कोणतीही भीती न बाळगता चालत्या बाईकवरून उडी मारली. यात तिच्या पायाला दुखापत झाली. तरीही आरोपीने तिला अंधारात ओढत नेत चाकूचा धाक दाखवला. त्याने तरुणीकडील सोन्याची आणि मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये रोख हिसकावून घेतले. इतकेच नाही तर आरोपीने स्प्रे दाखवत ॲसिड हल्ल्याची धमकीही दिली. मात्र तरुणीने जोरदार प्रतिकार करून आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिने आरडाओरडा सुरू केला. तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तात्काळ जमा झाले. नागरिकांनी बाईकचालकाला पकडून त्याला चोप दिला आणि नंतर महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी सिद्धेश संदीप परदेशी याला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे ॲप-आधारित बाईक टॅक्सी सेवा वापरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.