महायुतीतील वाद संपता संपेना, शिंदे गटाच्या नेत्याचे थेट भाजपला चॅलेंज, आडवे आलात तर….
कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील स्थानिक वाद विकोपाला गेला आहे. महायुतीत असूनही कल्याण पश्चिमेत दोन्ही पक्षांचे नेते, अरविंद मोरे आणि वरुण पाटील, एकमेकांना थेट आव्हान देत आहेत. स्थानिक पातळीवरील वर्चस्वासाठी संघर्ष तीव्र झाला आहे.

कल्याण डोंबिवलीतील भाजप-शिवसेना वाद संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता कल्याण पश्चिमेतही महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर मात्र पॅनलवाद तीव्र झाला आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना खुले आव्हान देताना दिसत आहेत. कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “शत्रू भाऊ असला तरी त्याला मारल्याशिवाय विजय नाही,” असा इशारा मोरे यांनी दिला आहे. तर “आमच्या आडवे आलात तर जशास तसे उत्तर देऊ,” असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. युती असली तरी स्थानिक पातळीवर तडजोड न करण्याची भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक विधाने केले आहे. विधानसभा निवडणुकीत ८० पैकी ६० जागा आमच्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आल्या. त्यावेळी महाराष्ट्रात एकच चेहरा होता आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवून देवेंद्र फडणवीस सत्तेत आले,” असा दावा अरविंद मोरे यांनी केला.
युती झाली तरी पॅनल क्रमांक दोन हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यातील एकही जागा भाजपला मिळणार नाही. या ठिकाणी विकासाच्या कामावर शिवसैनिकच उभे राहतील आणि आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवू,” असे त्यांनी स्पष्ट केले. महाभारत देखील भावा-भावात झाले होते. गीतेत सांगितले आहे की शत्रू तो शत्रूच असतो. शत्रू आपला भाऊ असला तरी त्याला मारल्याशिवाय विजय मिळू शकत नाही. त्यामुळे समोर युतीचा उमेदवार असला तरी आम्ही त्याला गारद करू,” असा गंभीर इशारा मोरे यांनी दिला आहे.
भाजपची प्रतिक्रिया काय?
अरविंद मोरे यांच्या इशाऱ्याला भाजपचे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी भाजपचा संयम हा कमजोरी नसल्याचे स्पष्ट केले. अरविंद मोरे यांनी पराभूत करण्याची भाषा केली असेल, तर भाजप जशास तसे उत्तर देण्यास तयार आहे. निवडणुकीत जनताच ठरवेल की कोणाला झोपवायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीचे वातावरण चांगले राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करत संयम ठेवून आहोत. मात्र, कोणी या युतीत मिठाचा खडा टाकण्याची भाषा करत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही.” असे प्रत्युत्तर वरुण पाटील यांनी दिले.
आमचा खरा शत्रू कोण आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण, त्या शत्रूला पराभूत करण्याच्या प्रक्रियेत कोणी आमच्या आड येत असेल, तर त्यांनाही आडवे करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे, असेही वरुण पाटील म्हणाले. दरम्यान कल्याण-डोंबिवली पट्ट्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील दरी रुंदावत चालली आहे. वरिष्ठ पातळीवर नेते एकीची भाषा करत असले तरी, स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्वासाठी दोन्ही पक्षात सामना सुरू झाला आहे.
