इंग्रज गेले पण औलाद…; मांसबंदीवरून काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घातल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या निर्णयाला हिटलरशाही असल्याचे म्हटले आहे आणि १९८८ च्या ठरावाला आधार देण्याऐवजी भ्रष्टाचाराविरुद्ध शपथ घेण्याची मागणी केली आहे.

इंग्रज गेले पण औलाद...; मांसबंदीवरून काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान
| Updated on: Aug 15, 2025 | 12:07 AM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपली भूमिका योग्य असून ती नियमांनुसार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नवीन सिंग यांनी याबद्दल आयुक्तांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “इंग्रज गेले पण औलाद सोडून गेले” असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे सरचिटणीस यांनी केले आहे.

एका विशिष्ट घटकावर अन्याय

कालच्या पत्रकार परिषदेत आयुक्त गोयल यांनी १९८८ साली घेण्यात आलेल्या एका ठरावाचा दाखला दिला. त्यानंतर त्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. यानंतर काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला. काँग्रेस नेते ॲड. नवीन सिंग यांनी आयुक्तांच्या या भूमिकेवर कडाडून टीका केली. त्यांनी या निर्णयाला हिटलरशाही असे म्हटले आहे. हा निर्णय खाटीक समाजाच्या उपजीविकेवर थेट गदा आणणारा आहे. या निर्णयामुळे समाजातील एका विशिष्ट घटकावर अन्याय होत आहे, असा आरोप अॅड. नवीन सिंग यांनी केला आहे. स्वातंत्र्य दिन हा भ्रष्टाचार दिन नाही. मग १५ ऑगस्टला मांसविक्री बंदी का? असा सवालही काँग्रेसने केला आहे.

यावेळी काँग्रेसने आयुक्तांना एक नवीन सूचना केली आहे. १९८८ च्या ठरावाचा आधार घेऊन बंदी घालण्याऐवजी, १५ ऑगस्टला KDMC मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार न करण्याची शपथ घ्यावी. कल्याण-डोंबिवलीतील रस्ते, अनधिकृत बांधकामे आणि इतर कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याची शपथ घ्यावी, अशी मागणी सिंग यांनी केली. यामुळे शहरात पारदर्शकता येईल आणि प्रशासनावर जनतेचा विश्वास वाढेल, असेही नवीन सिंग म्हणाले.

शहरात राजकीय संघर्ष वाढणार

महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे केवळ काँग्रेसच नव्हे, तर इतर विरोधी पक्ष आणि काही व्यापारी संघटनाही संतप्त झाल्या आहेत. आगामी काळात या निर्णयाविरोधात एक मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. हा वाद मिटणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सूचनेनुसार, स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ही बंदी १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. हा निर्णय १९८८ च्या एका ठरावावर आधारित असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने काढले होते.