कल्याणच्या वाहतूक कोंडीवर अखेर तोडगा; काय आहे प्रकल्प? किती वेळ वाचणार? कधी पूर्ण होणार? जाणून घ्या
कल्याण-विठ्ठलवाडी उन्नत मार्गाचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. उर्वरित जागेचे अधिग्रहण पूर्ण झाल्याने प्रकल्पाचे काम वेगाने होईल. हा १.६५४ किमी लांबीचा चार पदरी पूल कल्याण ते विठ्ठलवाडीचा प्रवास ५ मिनिटांत करण्यास मदत करेल.

कल्याणमधील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कल्याण-विठ्ठलवाडी उन्नत मार्ग आता लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या याची याच दिशेने वाटचाल सुरु आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या अधिग्रहणाला अखेर वेग आला आहे. यासाठी कल्याण पश्चिम येथील अशोक नगर परिसरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात उर्वरित वादग्रस्त जागेचे संपादन सुरू झाले आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठी अडचण दूर झाल्याने आता पुढील काम वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी एकूण ३८,१६० चौ. मीटर जागेचे भूसंपादन आवश्यक आहे. यापैकी आतापर्यंत २३,९५१ चौ. मीटर जागेचे अधिग्रहण पूर्ण झाले होते. मात्र, उर्वरित जागेच्या संपादनासाठी स्थानिकांनी सुरुवातीला मोठा विरोध दर्शवला होता. ही अडचण दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे, स्थानिक संघटना, राजकीय नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सांभाळणारे भन्तिजी यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही समस्यांवर तोडगा काढण्यात आला. ज्यामुळे जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरू झाले. या कामासाठी रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथकाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर उर्वरित जागेचे अधिग्रहण TDR (हस्तांतरीत विकास अधिकार) पद्धतीने केले जात आहे.
तीन प्रमुख महामार्गांना जोडणार
हा उन्नत मार्ग पूर्ण झाल्यावर कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानचा सध्याचा ४० ते ६० मिनिटांचा प्रवास केवळ ५ मिनिटांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या प्रकल्पासाठी ६४२.९८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा पूल १.६५४ किमी लांबीचा असून चार पदरी असेल. या प्रकल्पात पाम रिसॉर्ट ते कल्याण रेल्वे स्थानकासाठी स्वतंत्र मार्गिका, भवानी चौक, जगदीश दुग्धालय, कल्याण-मुरबाड रस्ता, पुणे लिंक रोडवरील सुधारणा, वालधुनी नदीकाठी संरक्षक भिंत आणि तीन चौकांची सुधारणा यांचा समावेश आहे. हा उड्डाणपूल कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा रेल्वे मार्गांना जोडण्यासोबतच तीन प्रमुख महामार्गांना जोडणार आहे.
पुढील दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित
सध्या या पुलाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित जागेचे संपादन झाल्याने पुढील काम अधिक वेगाने होईल, असे सांगितले जात आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प पुढील दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल.
