
किशोर पाटील, जळगाव प्रतिनिधी – राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत, त्यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, त्या जळगावमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खच्चीकरण करण्यासाठी, अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने पार्थ पवार यांचा घोटाळा पुढे आणला, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. एवढे वर्ष हा विषय पुढे का आला नाही? निवडणुकीच्याच वेळी हा विषय पुढे कसा आला? असा संदर्भ देत करुणा मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
भाजपनेच पार्थ पवार यांचा घोटाळा पुढे आणला आहे, एवढे वर्ष हा विषय पुढे का आला नाही? निवडणुकीच्याच वेळी हा विषय पुढे कसा आला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खच्चीकरण करण्यासाठी, अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने हा घोटाळा पुढे आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपने घोटाळा काढला पण पार्थ पवार जेलमध्ये कुठे आहे? त्यांना कोण वाचवत आहे? एवढा मोठा घोटाळा असताना का त्यांना वाचवले जात आहे? उपमुख्यमंत्री यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना वाचवला जात आहे का? असे अनेक प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
27 वर्षांपासून मी मंत्री धनंजय मुंडे यांची बायको आहे, गोपीनाथ मुंडे यांच्यापासून ते धनंजय मुंडे यांच्यापर्यंत संपूर्ण राजकारण मी जवळून पाहिलेलं आहे, आणि त्यामुळेच आज मी माध्यमांसमोर खरं खरं बोलते, भाजपनेच पार्थ पवार यांचा घोटाळा समोर आणला आहे. तुम्ही ब्रेकिंग न्यूज दाखवू शकता असं मिश्किल वक्तव्य देखील यावेळी करुणा मुंडे यांनी केलं आहे.
अशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोघांच्या शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप देखील करुणा मुंडे यांनी यावेळी केला. भाजपा हा कोणाचाच पक्ष नाही यांना फक्त हिटलर प्रमाणे हुकूमशाही करायची आहे, आणि हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे, असं विधान देखील करुणा मुंडे यांनी यावेळी केलं. पण असं काही होत नसतं, तुम्ही असं करू नका साहेब. आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, उद्या दुसरे कोणी सत्तेत असेल त्यामुळे तुम्ही काळजी करा असा सल्लाही यावेळी करुणा मुंडे यांनी भाजपला दिला आहे.