
माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून फारसे चर्चेत नाहीयेत, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती असलेल्या वाल्मिक कराडचं नाव आलं, यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच कोंडी केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतं होती, त्यानंतर आरोग्याचं कारण देत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याच काळात त्यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला, मधल्या काळात त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली, दरम्यान सध्या धनंजय मुंडे हे आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत.
धनंजय मुंडे यांनी आता मन:शांतीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्रात ध्यानधारणा करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तींयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा हा कार्यक्रम दहा दिवसांचा असून, त्यानंतर ते पुन्हा एकदा दोन जूनपासून कामाला सुरुवात करणार असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे हे गेल्या आठ दिवसांपासून इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्रात विपश्यना करत आहेत, यावर आता करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘चांगली गोष्ट आहे, अगोदरच त्यांनी ध्यान धारणेचा मार्ग स्वीकारलेला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं मंत्रिपद गेलेले आहे. आमदारकी सुद्धा जाणार आहे, असा खोचक टोला यावेळी करुणा शर्मा यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा?
‘चांगली गोष्ट आहे, अगोदरच त्यांनी ध्यान धारणेचा मार्ग स्वीकारलेला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं मंत्रिपद गेलेले आहे. आमदारकी सुद्धा जाणार आहे. गुंड लोकांची हकालपट्टी राष्ट्रवादीतून सुरू झालेली आहे. मला असं वाटत आहे की, लवकरात लवकर अजितदादा त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार आहेत, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी चांगला पर्याय निवडला असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांना आता मंत्रिपद भेटलं आहे, त्यांना आता धनंजय मुंडेंची काही गरज राहिलेली नाही. त्यामुळे त्या असं वक्तव्य करू शकतात. त्यांचं तर काम झालं आहे, त्यांना मंत्रिपद देण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केलं आहे. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना परळी काबीज करायची आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.