
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत मोठी आणि निर्णायक राजकीय खेळी खेळली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही खेळी यशस्वी झाली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना एकाच वेळी मोठा धक्का बसला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील एक प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश रविवार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. दीपेश म्हात्रे यांच्यासोबत ७ ते ८ माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होणार आहे. ज्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे.
दीपेश म्हात्रे हे केवळ एक नगरसेवक नाहीत. तर त्यांच्या कुटुंबाचा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे माजी महापौर होते. तर त्यांची आई आणि बंधू देखील नगरसेवक म्हणून कार्यरत होते. दीपेश म्हात्रे हे तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राजकीय वर्तुळात दीपेश म्हात्रे हे एकनाथ शिंदे गटात सामील होतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने युतीत असूनही शिंदे गटाला हा अप्रत्यक्षपणे धक्का मानला जात आहे. म्हात्रे यांनी यापूर्वी शिंदे गटातूनच बाहेर पडून ठाकरे गटात प्रवेश केला होता.
दीपेश म्हात्रे यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे हे देखील पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे काँग्रेसचीही विकेट भाजपने घेतली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी भाजपने ठाकरे गट, शिंदे गट आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांना एकाच दिवशी मोठा हादरा दिला आहे. या पक्षप्रवेशांच्या माध्यमातून भाजपने कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. भाजपच्या गोटात आणखी काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, तात्यासाहेब माने यांची अंतरिम जिल्हाप्रमुखपदी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुखपदासाठी ॲड. रोहिदास मुंडे यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. मुंडे यांच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्वाला संधी देऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यास पक्ष संघटनेत नवा उत्साह येण्याची शक्यता आहे. या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर, शिवसेना ठाकरे गट डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोणती पाऊले उचलते, शिवसेना शिंदे गट यावर काय प्रत्युत्तर देतो, हे KDMC च्या पुढील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.