‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
Ketan Agarwal Death Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट होता. तपासादरम्यान समोर आलेले डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि संशयास्पद हालचालींमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी झालेल्या 26 वर्षीय केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतनचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट होता. तपासादरम्यान समोर आलेले डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि संशयास्पद हालचालींमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अशातच आता या प्रकणात आणखी एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतनची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकराने हे कृत्य केल्याचे समोर आले. जेव्हा केतनच्या अंत्यसंस्कारानंतर चार दिवसांनी सिया गोयल कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आली. त्यावेळी कुटुंबीय दुःखात होते. त्यावेळी बोलताना सियाच्या काही उत्तरांबाबत केतनच्या बहिणीला संशय आला. या घटनेविषयी संपूर्ण सत्य सांगितले जात नसल्याची भावना तिला झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला, त्यामुळे पोलिस तपासाला नवी दिशा मिळाली.
2004 वेळा फोन
पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवल्यानंतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या कॉल रेकॉर्डची छाननी केली. त्यामध्ये 1 जानेवारी ते जून या कालावधीत दोघांमध्ये तब्बल 2,004 वेळा संवाद झाल्याचे आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत त्यांनी सुमारे 238 तास फोनवर चर्चा केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणातील संवादामुळे तपास यंत्रणांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
संशयामुळे तपासाला दिशा
पोलिस तपासात 18 जून रोजीच्या हालचालीही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 5.40 या कालावधीत चेतन चौधरीचे इंटरनेट बंद होते. हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानून पोलिसांनी त्याच्या हालचालींची सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान असेही उघड झाले की, चेतन चौधरीने कथितपणे आपला मोबाईल दुकानात ठेवून दिला होता. पोलिसांचा दावा आहे की, तो आपल्या कर्मचाऱ्याचा मोबाईल घेऊन लोहगड येथे गेला होता. वास्तविक लोकेशन लपवण्यासाठी आणि मोबाईल ट्रॅकिंगपासून बचाव करण्यासाठी त्याने असे केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
यानंतर पोलिसांनी 18 जून रोजी चेतनच्या मोबाईलवर आलेल्या सर्व कॉल्सची तपासणी केली. त्या दिवशी फोन करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनेकांनी सांगितले की फोनवर स्वतः चेतन बोलला नव्हता, तर त्याच्या कर्मचाऱ्यांनी कॉल स्वीकारून उत्तरे दिली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.
डिजिटल पुराव्यांनी तपासाला नवे वळण
पोलिसांचे म्हणणे आहे की, कॉल रेकॉर्ड, इंटरनेट वापर, मोबाईल लोकेशन आणि चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीमुळे तपासाचा कल हत्येच्या कटाकडे वळला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या कड्या जोडल्या आहेत. आता पोलिस डिजिटल पुरावे आणि चौकशीच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास करत आहेत. काही दिवसांनी याबाबत सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.