Kalyan Crime : ‘धूम’ स्टाईलने गुन्हे, क्षणार्धात फरार… असा पोलिसांच्या सापळ्यात अडकला अब्बास

ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत इराणी चोरटा अब्बास सय्यदला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या दुचाकी वापरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणारे ९ गुन्हे त्याने कबूल केले असून, त्याच्याकडून नऊ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अब्बासच्या अटकेमुळे ठाण्यातील सोनसाखळी चोरी व दुचाकी चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार आहे.

Kalyan Crime : धूम स्टाईलने गुन्हे, क्षणार्धात फरार... असा पोलिसांच्या सापळ्यात अडकला अब्बास
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 07, 2026 | 8:19 AM

ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना अनेक महिन्यांपासून सतत गुंगारा देणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला अखेर खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या दुचाकींवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून क्षणार्धात पसार होणाऱ्या अब्बास सय्यद या आरोपीला वडवली परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल नऊ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्याच्या अटकेमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना विशेष पथक वडवली परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान पोलिसांना अब्बास सय्यद हा संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

अशी होती चोराची मोडस ऑपरंडी

चौकशीदरम्यान अब्बास सय्यद हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे समोर आले. तपासात त्याने गुन्हे करण्यासाठी एक वेगळीच पद्धत अवलंबल्याचे उघड झाले. तो प्रथम महागड्या दुचाकी चोरी करत असे. त्यानंतर याच चोरीच्या बाईकचा वापर करून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावण्याच्या घटना घडवत असे. चोरीची दुचाकी वापरल्यामुळे पोलिसांना आरोपीचा माग काढणे अवघड जात होते आणि तो वारंवार पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.

आरोपीविरोधात विविध गुन्हे दाखल

अब्बास सय्यदविरोधात ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरी, चेन स्नॅचिंग आणि बतावणी करून लूट अशा स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आणखी दोन गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या नऊ महागड्या दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची किंमत लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने खडकपाडा पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

अब्बास सय्यदच्या अटकेमुळे ठाणे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपीच्या इतर साथीदारांचा शोधही सुरू असून, या टोळीशी संबंधित आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us