
रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या खोपोलीत आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मंगेश काळोखे यांची अज्ञात इसमांनी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आज सकाळच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सुखरूप सोडून ते दुचाकीवरून घराकडे परतत होते. त्यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले. एका काळ्या रंगाच्या संशयास्पद चारचाकी गाडीतून आलेल्या ३ ते ४ अज्ञात हल्लेखोरांनी काळोखे यांची गाडी अडवली. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले.
हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे हे रस्त्यावर कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळोखे यांना सोडून आरोपी गाडीसह घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर मंगेश काळोखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
खोपोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी विजय मिळवून नगरसेवक पद मिळवले होते. या विजयानंतर काळोखे कुटुंबाचा राजकीय प्रभाव वाढला होता. निवडणुकीच्या निकालाचा राग किंवा जुन्या राजकीय वादातून हा टोकाचा सूड घेण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक परिसरात ही हत्या सुपारी देऊन केली असल्याची चर्चा आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पंचनामा पूर्ण केला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोलीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
या घटनेनंतर रायगड पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहेत. संशयास्पद काळ्या गाडीचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. “आम्ही घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून काही धागेदोरे हाती लागले आहेत. आरोपींना लवकरच जेरबंद करू,” असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.