कोल्हापूरच्या महादेवी हत्तीसाठी वनताराचा अनोखा पुढाकार, विशेष केंद्र उभारणार, काय असणार वैशिष्ट्ये?

कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण माधुरीची वनतारामध्ये रवानगीनंतर निर्माण झालेल्या वादानंतर, वनताराने कोल्हापुरातच एक अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. हे केंद्र हायड्रोथेरपी, लेझर थेरपी आणि २४ तास पशुवैद्यकीय सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. यामुळे माधुरीला उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचाही आदर राखला जाईल.

कोल्हापूरच्या महादेवी हत्तीसाठी वनताराचा अनोखा पुढाकार, विशेष केंद्र उभारणार, काय असणार वैशिष्ट्ये?
cm devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 07, 2025 | 3:56 PM

कोल्हापूरच्या प्रसिद्ध जैन मठातील हत्तीण महादेवी (माधुरी) प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीणीची रवानगी वनतारामध्ये करण्यात आली होती. यानंतर मोठा जनआक्रोश पाहायला मिळाला. त्यातच आता वनताराकडून कोल्हापूरवासियांच्या भावना दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, नांदणी मठाची माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा शब्द अधिकाऱ्यांनी दिला. त्यातच आता अनंत अंबानी यांच्या वनतारा उपक्रमाने एक अभिनव आणि संवेदनशील मार्ग निवडला आहे. कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन, वनताराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात, खास करून कोल्हापूरच्या जवळ, हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

गेले काही महिने महादेवीच्या आरोग्याबद्दल आणि तिच्या काळजीबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. वनताराने या प्रकरणात लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टींचा आदर करत एक अनोखा तोडगा काढला आहे. या प्रस्तावानुसार, नांदणी परिसरात हे केंद्र उभारले जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून महादेवीला कोल्हापूरपासून दूर जावे लागणार नाही. विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. वनताराने प्रस्तावित केलेल्या या केंद्रात महादेवीसाठी सर्व अत्याधुनिक आणि वैज्ञानिक सुविधा असतील. ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल.

या केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये काय?

  • हायड्रोथेरपी तलाव आणि पोहण्यासाठी जागा: संधिवात आणि पायांच्या इतर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त
  • लेझर थेरपीसाठी खास कक्ष: वेदना कमी करण्यासाठी आणि उपचारांसाठी विशेष व्यवस्था.
  • २४x७ पशुवैद्यकीय सुविधा: २४ तास तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध असतील.
  • मुक्त निवासस्थान: महादेवीला सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे फिरता येईल.
  • मऊ गादीसारखी रबरयुक्त जमीन आणि सॉफ्ट सँड माऊंड्स: यामुळे पायांच्या आजारांवर आराम मिळेल आणि चालणे सोपे होईल.

कल्याण आणि पुनर्वसनासाठी एक नवा आदर्श

वनताराच्या म्हणण्यानुसार, हे केंद्र केवळ महादेवीसाठीच नव्हे, तर भविष्यात गरज पडल्यास इतर हत्तींनाही मदत करू शकेल. हे केंद्र महाराष्ट्र शासन आणि जैन मठ यांच्या सहकार्याने विकसित केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी उच्चस्तरीय समितीचा सल्ला घेतला जाईल. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले जाईल.

दरम्यान अनंत अंबानी यांचा वनतारा उपक्रम केवळ तात्कालिक समस्यांवर उपाय शोधत नाही, तर भावनिक संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सहकार्याचे अनोखे उदाहरण सादर करत आहे. या निर्णयामुळे महादेवीच्या आरोग्याला प्राधान्य मिळेल आणि सोबतच कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांचाही आदर राखला जाईल. सध्या हे केंद्र कोठे उभारले जाईल, याबाबत अंतिम निर्णय वनतारा, जैन मठ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात चर्चा करून घेतला जाईल. अधिकृत मंजुरी आणि जमीन उपलब्ध झाल्यावर वनताराची तज्ज्ञ टीम त्वरित कामाला सुरुवात करण्यास सज्ज आहे. हा उपक्रम भारतातील प्राणी कल्याण आणि पुनर्वसनासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.