आधी संविधानाचा अभ्यास करा, प्रोटोकॉलनुसार…मोदींच्या फोटोवरून कृष्णराज महाडिकांनी अमित ठाकरेंना सुनावलं!
अमति ठाकरे यांनी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच वसतीगृह अधिक्षकांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला.

Amit Thackeray : मनसेचे नेते अमित ठाकरे तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकल्याने मोठा वाद झाला आहे. भाजपाने अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मोदींचा फोटो हटवल्याने आज मुंबईत भाजयुमोने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसले. आंदोलनस्थळी काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याच आंदोलनात भाजपयुमोचे महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज महाडिक हेदेखील उपस्थित होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता कृष्णराज महाडिक यांनी संताप व्यक्त केलाय.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली. डिटेन आम्हाला नाही मनसेच्या गुंडांना करावे. आमच्या लोकांना त्यांनी मारहाण केली. आमच्या मुलांच्या चेन स्नॅचींगही झाल्या आहेत. आमच्या मुलांवर कोचेच्या बॉटलही फेकण्यात आल्यात. आमच्या मुलांना त्रास देतात पोलिसांनी हा विषय गांभिर्यांने घ्यावा, अशी मागणी महाडिक यांनी केली. तसेच गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.
शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत. त्यांच्या नावाने राजकारण का केले जात आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावणे हा प्रोटोकॉल आहे. आधी संविधानाचा अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी मनसेला दिला. मनसे कार्यकर्ते भाजप युवा मोर्चाच्या शांततापूर्ण आंदोलनात कसे आले, असा रोखठोक सवालही त्यांनी केला.
भाजयुमोच्या आंदोलनात काय घडले?
अमति ठाकरे यांनी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच वसतीगृह अधिक्षकांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. त्यांनी अधिक्षकांच्या कार्यालयात असलेला मोदी यांचा फोटो हटवा, हा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असता कामा नये, असे सांगितले. त्यानंतर मनसेच्या एका कार्यकर्त्याने मोदींचा भिंतीवरील फोटो हटवला. आता याच फोटो हटवण्यावरून वाद सुरू आहे. अमित ठाकरे यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.