Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 1500 रुपये मिळणं कायमचं बंद ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ६० लाखांपर्यंत महिला अपात्र ठरू शकतात. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शासनाने eKYC अनिवार्य केले आहे. अनेक महिलांच्या eKYC प्रक्रियेत चुका झाल्या असून, त्या दुरुस्त करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे. या मुदतीत दुरुस्ती न केल्यास १५०० रुपयांचा मासिक लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. पात्र महिलांनी त्वरित दुरुस्ती करावी.

Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 1500 रुपये मिळणं कायमचं बंद ?
लाडकी बहीण योजना
| Updated on: Mar 13, 2026 | 8:18 AM

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला, आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दरमहा त्यांच्या खात्यात निधी जमा होतो. मात्र शासनाच्या या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला, फसवणूक करत पैसेही लाटले. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. निवडणुकीनंतर निकषांच कारण देत सरकारने ई-केवायसी प्रक्रिया (Ladki Bahin Yojana eKYC)अनिवार्य केली. आता याच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. कारण याच ई-केवायसीमुळे कतब्बल 60 महिला या नावडत्या बहिणी होऊ शकतात,त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं कायमचं बंद होऊ शकतं.

31 मार्चपर्यंत ईकेवायसी करा

निकषांच कारण देत सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाना ई-केवायसी करणं बंधकारक केलं होतं. आधी ती तारीख डिसेंबर 2025 पर्यंत होती, नंतर ई-केवायसीची मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली.अनेक महिलांनी ई-केवायसीमध्ये चुका केल्या, ही प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुदतीपूर्वी दुरूस्ती करा नाहीतर..

ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. 31 मार्च ही केवायसी दुरुस्तीची शेवटची तारीख आहे आणि यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात येणार आहे. 31 मार्च अखेर एकूण 2 कोटी 47 लाख लाभार्थी महिलांपैकी 50-60 लाख महिला या अपात्र ठरू शकतात. निकषात न बसणाऱ्या आणि अपात्र बहिणींची संख्या 60 लाखांच्या घरात जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांना योजनेचा लाभ आणि पर्यायाने दरमहा मिळणारे योजनेचे 1500 रुपये मिळणे कायमचं बंद होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सुरूच राहणार लाडकी बहीण योजना

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले, त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला. या योजनेसाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात 36 हजार कोटींची तरतूद केली आहे

Follow Us