धक्कादायक… लाडकी बहीण योजनेमुळे नवरा-बायकोंवर घटस्फोटाची वेळ? शेतकरी महिलेने उद्धव ठाकरेंना नेमकं काय सांगितलं?
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंबात वाद, अगदी घटस्फोटाची वेळ आल्याचे समोर आले आहे. धाराशिव येथे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान, एका महिलेने ई-केवायसीमुळे गाडी घेण्यास विरोध केल्याने नवरा-बायकोत भांडणे झाल्याचे सांगितले.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरु केलेली लाडकी बहिण योजना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आता याच लाडकी बहीण योजनेमुळे घराघरात भांडण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे नवरा बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली आहे. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका शेतकरी महिलेने लाडकी बहीण योजनेमुळे कुटुंबात समस्या निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात एका आंदोलक महिला शेतकऱ्याने सरकारच्या अटी नियमांवर आक्रमक भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे एका कुटुंबात घटस्फोटाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे एका शेतकरी कुटुंबात मोठी समस्या उभी राहिली आहे. या योजनेतील अटींमुळे नवरा-बायकोच्या संसारात वादळ निर्माण झाले आहे. यामुळे ते थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ
माझा नवरा गाडी घेण्याच्या विचारात होता. मात्र, गाडी घेतल्यास लाडकी बहीण योजनेतून मिळणारे दीड हजार रुपये बंद होतील या भीतीने मी त्याला विरोध केला. यावरुन आम्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. आता हे भांडण टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे, अशी तक्रार त्या महिला शेतकऱ्याने केली. या घटनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या योजना कशा कुटुंबांमध्ये फूट पाडत आहेत यावरुन जोरदार टीका केली. लाडक्या बहिणीच्या पैशामुळे घरात नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धाराशिव येथील चौपालमध्ये आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. या सरकारने फसवे पॅकेज जाहीर केले आहे. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही, फक्त आमच्या मालाला हमीभाव द्या. शेतकऱ्याला तुमची भीक नकोय. त्याला त्याच्या हक्काचा भाव हवा आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवू
हिंमत असेल तर सरकारने खात्यात रक्कम जमा करून येथे येऊन दाखवावे. अजित पवारांनी हिंमत असेल तर कर्जमाफी द्यावी. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवू. शेतकऱ्यांनी सरकारचा भ्रमाचा भोपळा आणि टरबूज फोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जात-पात, धर्म सोडून एकजूट राहावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्या. नुकसानीपोटी अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. हेक्टरी २ रुपये ते ७ हजार रुपये अशी तुटपुंजी मदत मिळाली असून, दिवाळीत हायब्रीड (खराब) धान्य मिळाले असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली. तसेच येरमाळा गावातील उपोषणकर्त्या महिला शेतकऱ्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, तर सामाजिक कार्यकर्ती आहे. आम्ही चार दिवस आमरण उपोषण केले, तरी सरकारने दखल घेतली नाही. मी जेव्हा झाडावर चढले, तेव्हा कुठे सरकार जागे झाले, असे ती महिला म्हणाली. या सर्व घटनाक्रमामुळे धाराशिवमधील शेतकरी वर्गातील असंतोष आणि सरकारी योजनांची दुर्दशा स्पष्ट दिसून येत आहे.
