जळगाव हादरलं; जमिनीच्या वादातून डॉक्टरसोबत भयानक कांड, मृतदेह थेट धरणात सापडला…
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत बांधून धरणात फेकण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलं असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेत जमिनीच्या व्यवहारातून डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. संजय तेली असं या हत्या झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. संजय तेली हे गोरडखेडा येथून 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह गोणीत बांधून बहुळा धरणार फेकण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 1 कोटी 25 लाखांच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणात ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. जमिनीचा व्यवहार घडवून आणणाऱ्या एजंटला कमिशन देण्याच्या बहाण्याने डॉक्टर संजय तेली यांना गोराडखेडा येथे बोलून घेण्यात आले होते, अशी माहिती देखील समरो येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा येथून बेपत्ता झालेल्या डॉक्टर संजय तेली यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आज सकाळी बहुळा धरणातून गोणीत बांधलेला त्यांचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आहे. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी एक कोटी 25 लाख रुपयांच्या जमिनीच्या व्यवहारासाठी डॉक्टर तेली गोरडखेडा येथे आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोबाईलचे शेवटचे लोकेशन गोरडखेडा येथे मिळाले होते. तसेच त्यांची कारही परिसरात आढळली होती. पोलिसांनी संशयावरून राहुल धर्मराज पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीला संजय भील याने मदत केल्याचेही तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला जमिनीच्या व्यवहारापोटी 80 लाख रुपये दिले होते, अशी माहिती डॉक्टर तेली यांच्या कुटुंबीयांनी दिली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.