Neet Paper Leak : बाबा मी चांगला अभ्यास केला, पण आता… आत्महत्येपूर्वी लेकीची शेवटची हाक, वडिलांची डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया
नीट परीक्षेच्या तणावामुळे लातूरमधील मैथिली सोनावणे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. 'मी चांगला अभ्यास केला, पण आता काय होईल?' ही तिची शेवटची चिंता वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात व्यक्त केली आहे.

राज्यात नीट (NEET) परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळाने सर्वत्र तणाव निर्माण झाला आहे. याच कारणामुळे एका निष्पाप विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथे नीट परीक्षेच्या वाढत्या मानसिक तणावाला बळी पडत मैथिली अशोक सोनावणे या १८ वर्षीय विद्यार्थिनीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेनंतर मैथिलीचे वडील अशोक विठ्ठल सोनावणे यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबात त्यांच्या मुलीची शेवटची वेदना आणि तिची भीती बोलून दाखवली आहे.
बाबा, मी अभ्यास केला पण आता काय होईल?
आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशोक सोनावणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गटेगाव पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या जबाबात त्यांनी मैथिलीच्या मनात नक्की काय सुरु होते, याबद्दलची माहिती दिली. माझी मुलगी मैथिली एक हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलगी होती. यंदा ती बारावीच्या परीक्षेत ५१.५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी ती दिवस रात्र नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होती. तिने सीईटी परीक्षाही दिली होती.
नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि परीक्षा रद्द झाल्याची बातमी आल्यानंतर मैथिलीला प्रचंड त्रास झाला. तिला मानसिक तणाव आला होता. ती सतत भविष्याची चिंता करत असायची. ती मला नेहमी म्हणायची, ‘बाबा, मी खूप चांगला अभ्यास केला आणि परीक्षेत चांगले गुणही मिळवले, पण आता पुढे काय होईल? सगळं कसं होईल? तिच्या डोक्यात सतत हाच विचार सुरू होता, असे तिच्या वडिलांनी सांगितले.
शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
दरम्यान १६ मे रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सकाळी मैथिली घरात न दिसल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. अखेर ती त्यांच्याच शेतातील एका कडुलिंबाच्या झाडाला स्कार्फच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर कुटुंबीयांनी अत्यंत घाईघाईने तिला खाली उतरवून मुरुड येथील सरकारी रुग्णालयात नेले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी वडिलांनी स्पष्ट केले आहे की, मुलीच्या मृत्यूबाबत त्यांना कोणावरही संशय किंवा तक्रार नाही.
कर्नाटकातही ‘नीट’च्या तणावातून भाग्यश्रीची आत्महत्या
नीट परीक्षेच्या तणावाची ही दाहकता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातही भाग्यश्री नावाच्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भाग्यश्री अत्यंत हुशार होती. तिने पीयूसी परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. नुकतीच तिने नीट-यूजी २०२६ परीक्षा दिली होती. परीक्षा आणि निकालाच्या मानसिक दबावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या दोन्ही घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असं पाहायला मिळत आहे.