स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? देवेंद्र फडणवीस यांचे एक घाव दोन तुकडे; आता चर्चांनाही पूर्णविराम

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, आतापासूनच सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? देवेंद्र फडणवीस यांचे एक घाव दोन तुकडे; आता चर्चांनाही पूर्णविराम
| Updated on: Jul 28, 2025 | 5:34 PM

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं, ते वर्धा येथे बोलत होते.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतत लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिथे शक्य आहे तिथे महायुतीत लढू, जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही, महायुती हा नियम आहे. मैत्रीपूर्ण लढत हा फक्त अपवाद असू शकतो, काही ठिकाणी तो होईल, काही ठिकाणी होणार नाही, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे, यावर देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ‘कोण कोणासोबत युती करत आहे, हे गौण आहे. मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचे आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, ते वेगळे लढले किंवा एकत्रित लढले, कसेही होऊ द्या तरीही महापौर महायुतीचाच होणार,’ असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, सुमारे 14 हजार अशा प्रकारचे अर्ज समोर आले आहेत, याबाबत देखील फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे की 26 लाख असे अकाउंट सापडले आहे जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत. त्यात काही पुरुष आहेत, काही अन्य योजनांचा लाभ घेणारे आहेत, काही इन्कम टॅक्स भरणारे आहेत. निकषात न बसणारे अकाउंट आहे, ते रद्द केलेले नाहीत ते फक्त सस्पेंड केले आहेत. पुन्हा एकदा त्याची शहानिशा केली जाईल, त्यानंतर ते अकाउंट बंद केले जातील, असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.