Mahadev Munde Case: आठ दिवसांच्या आत कारवाई करा, अन्यथा… जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायासाठी सरकारकडे दाद मागत आहेत. आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

Mahadev Munde Case: आठ दिवसांच्या आत कारवाई करा, अन्यथा... जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा
Majoj Jarange
| Updated on: Jul 23, 2025 | 9:10 PM

महादेव मुंडे यांची 20 महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीत निर्घृण हत्या झाली होती. मात्र या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायासाठी सरकारकडे दाद मागत आहेत. मात्र पोलिसांकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले जात नाही. अशातच आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले की, न्यायासाठी जरांगे पाटील यांनी माझ्यासोबत उभा रहावं. मी पोलिसांकडे गेले परंतु पोलिसांनी मला नेहमी सांगितलं की तुम्हीच आरोपी सांगा. बाळा बांगर यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की, महादेव मुंडे यांचा मासाचा तुकडा टेबलवर आणून ठेवला, हे मला असाह्य झालं. आपल्याला पत्नी म्हणण्याचा काय अधिकार असा प्रश्न मनात आला आणि म्हणून मी विष घेतले त्यावेळी यंत्रणा हलली.

पुढे बोलताना ज्ञानेश्वरी म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश सोळंके यांनी प्रश्न मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोपीला सोडणार नाही, अशी माहिती दिली, मात्र मला आशा वाटली नाही. मी आज मनोज जरांगे पाटील यांना म्हटले मला तुमच्या मदतीची गरज आहे, आणि मी स्वतःहून मनोज जरांगे याना भेटायला आले. माझ्या भावाने अनेक चकरा मारल्या परंतु कोण्याही लोकप्रतिनिधीनी मदत केली नाही.

सरकार लाडक्या बहिणी बाबत गंभीर नाही, ते फक्त निवडणूकी पुरते होते, लाडकी बहीण ही आता तिच्या कुंकवासाठी न्याय मागत आहे. अजित पवार हे दर महिन्याला बीडला येतात, महादेव मुंडे केस बाबत अजित दादा का बोलले नाहीत. अजित दादा बीडचे पालकमंत्री आहेत आणि मी त्यांना प्रश्न केला होता की, तुम्ही महादेव मुंडे बाबत का बोलत नाहीत, महादेव मुंडे लोकप्रतिनिधी नव्हता का..? मी तुमची लाडकी बहीण नाही का..?

मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही कायम महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत राहणार आहोत आणि न्याय भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. हत्या किती क्रूरपणे झाली हे कुणाला माहीत नव्हते, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना माहीत झाले. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपी आठ दिवस मांस घेऊन फिरत होते. मुख्यमंत्री यांना मान खाली घालयला लावणारी बाब आहे. कारण तुमच्या राज्यात महादेव मुंडेचा खून होतो आणि ते आरोपी दोन वर्षे सापडत नाहीत. असे मुडदे पडत असतील तर बीड जिल्ह्यातील लोकांनी आता जागे झाले पाहिजे.

फडवणीस यांचं राज्य गुंड चालवतात का? तुम्हाला या राजगादीवर बसवणारी गोरगरीब जनता आहे. मुख्यमंत्री यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वेळ द्यावा, ते वेळ का देऊ शकत नाही? महादेव मुंडे प्रकरणात जो काही तपास होत आहे, तो तपास ज्ञानेश्वरी मुंडे यांना सांगितला पाहिजे. महादेव मुंडे प्रकरणात पहिल्या दिवसापासून ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यांचे आम्हाला सी डी आर पाहिजेत.

महादेव मुंडे प्रकरणात बीडच्या जनतेने रस्त्यावर उतरायचे ठरवले किंवा आंदोलन करायचे ठरवले तर मुख्यमंत्र्‍यांना अवघड जाईल, मी मनोज जरांगे तुम्हाला विनंतीपूर्वक सांगत आहे की, आठ दिवसाच्या आत एसआयटी गठीत करा, त्यात मुंडे कुटुंबाचे माणसे घ्या, आरोपी अटक केल्यानंतर मुंडे कुटुंबांना सरकारी वकील द्या. या कुटुंबाला शंभर टक्के धोका आहे आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.

बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी बीड जिल्हा सोडून द्या, आम्हाला त्यांची काहीही गरज नाही, आम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही पालकमंत्री म्हणून काय करता आमचे मुडदे पाडता का? अजित पवार पालकमंत्री झाले तर बीडचा चेहरा मोहरा बदलेल असे आम्हाला वाटत होते पण तसे झाले नाही.

देवेंद्र फडवणीस आणि अजित दादा पवार यांना विनंती आहे की, दोघांनीही आठ दिवसाच्या आत आरोपी अटक करावी. आठ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर अठरा पगड जातीचे लोक तुम्हाला बीड मध्ये एकत्र आलेले दिसतील, आणि कसा मोर्चा असतो हे तुम्हाला दिसेल असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.