माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे – सुप्रिया सुळेंचा इशारा

| Updated on: Mar 15, 2024 | 11:19 AM

माझ्या मतदारसंघात कुणीही दमदाटी करायची नाही, धमकी द्यायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला. हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे..असे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला सुनावले.

माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे - सुप्रिया सुळेंचा इशारा
Follow us on

पुणे | 15 मार्च 2024 : माझ्या मतदारसंघात कुणीही दमदाटी करायची नाही, धमकी द्यायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला. हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे..असे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला सुनावले. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला.

पैशांची मस्ती आली आहे, सुप्रिया सुळेंचा घणाघात

माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे. माझा नंबर लिहू घ्या. तुम्हाला कोणाचाही फोन आला तर माझा नंबर द्या आणि सांगा की आधी सुप्रिया ताईशी बोला. मी बोलते मग, बघून घेईन, असं सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं. बारामती मतदारसंघात किंवा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते एकमेकांना धमकी देत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? असा खडा सवाल विचारत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.

सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे, जसा चढता काळ येतो, तसा उतारही येतो. मला काहीच करायची गरज नाही, त्यांची सगळी मस्ती जनता लवकरच उतरवेल, असा इशाराचा त्यांनी दिला. आम्ही लोकशाहीने निवडणूक लढवत आहोत त्यामुळे आम्ही दडपशाहीला घाबरणार नाही,असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं होतं ?

भाजपात गेल्याने आपल्याला शांत झोप लागते असे विधान करुन चर्चेत आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या इंदापूरात फिरु नको म्हणून धमकी मिळाली असल्याची तक्रार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. भाजपाचे मित्रपक्षच आपल्या शिवीगाळ करीत असल्याचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते. हे अत्यंत धक्कादायक असून यात तात्काळ लक्ष घालावे असे पत्रच हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. त्याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला तसेच अजित पवार गटालाही लक्ष्य केलं.