Maharashtra Breaking News LIVE : व्होट जिहादवरून राज्यातील निवडणुकीचं वातावरण तापलं, आरोपप्रत्यारोपाच्या फैरी
Maharashtra Election News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज 16 नोव्हेंबर 2024 राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये एकनाथ शिंदे यांच्या एकूण तीन सभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचा आज गाव भेट दौरा करत आहेत. पुण्यातील पर्वती मतदारसंघात दीड लाख मतदान चिठ्ठयांचं वाटप केलं गेलं आहे. पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची 11.30 पत्रकार परिषद होणार आहे. पुणे शहरातील तापमानात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभर तापमान कमी होतं. मात्र शुक्रवारी तापमानात वाढ झाली आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
सुखबीर सिंग बादल यांनी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला
शिरोमणी अकाली दल (एसएडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
-
तुम्ही नको तिथे मत देऊ नका- नारायण राणे
तुमचे आशीर्वाद द्या पण नको तिथे मत देऊ नका, असं नारायण राणे यांनी सांगितले.
-
-
ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या विदेशी महिला पर्यटकाचा मृत्यू
ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिला पर्यटकाचा तिकीट काउंटरकडे जाताना आजारी पडल्याने मृत्यू झाला. तिला घाईघाईने व्हीलचेअरवर बसवून गेटवर आणण्यात आले. पण तत्पूर्वी तिची प्राणज्योत मालवली होती.
-
सिंधुदुर्गात मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरु असताना पाऊस, लगेच म्हणाले..
सिंधुदुर्गात शिवसेनेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी भाषण करताना पाऊस आला. हा धागा पकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशीर्वाद असा उल्लेख केला. तसेच दीपक केसरकर आणि निलेश राणे जिंकणार हे जाहीरपणे सांगून टाकलं.
-
हापूरमध्ये महामार्गाच्या बाजूला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
उत्तर प्रदेशातील हापूरमधील सिटी कोतवाली येथील राष्ट्रीय महामार्ग 9 जवळील सर्व्हिस रोडवर एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुटकेसमध्ये सापडलेला मृतदेह पाहता या महिलेचा आधी खून करून नंतर येथे फेकून दिल्याचे दिसते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, थोड्याच वेळात प्रचार सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे स्वतः कार चालवत आले. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची प्रचार सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्यासह मनसेतील काही प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहेत.
-
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बचा स्फोट, कुणीही जखमी नाही
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बचा स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झालेलं नाही, जिल्ह्यातील भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिसांना बॉम्ब पेरून ठेवल्याची माहिती मिळाली होती. पथकाकडून एक बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. यात कोणीही जखमी झाले नाही, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
-
प्रगत जीवनशैली, चांगल्या सुविधा आणि रोजगाराच्या संधीचा मास्टर प्लान तयार : पीयूष गोयल
उत्तर मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. “उत्तर मुंबई ही उत्तम मुंबई” बनवण्याचा दृढ संकल्प महायुतीने केला आहे. या भागातील लोकांना प्रगत जीवनशैली, चांगल्या सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्याकडे मास्टर प्लान तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
-
सटाणा विधानसभा मतदार संघात बच्चू कडू यांची सभा
सटाणा विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाचे उमेदवार जयश्री गरुड यांच्या प्रचारार्थ प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांची जाहीर सभा घेतली जात आहे.
-
प्रियांका गांधी यांची पहिल्यांदाच कोल्हापुरात सभा
कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर आणि करवीरच्या काँग्रेस पुरस्कृत उमेदवारासाठी प्रियांका गांधींची सभा आयोजित केली आहे.
-
…तर ठाकूरांच्या घराचे नळ कनेक्शन तोडू – बच्चू कडू यांचा इशारा
वसई-विरारमध्ये पाणी नाही पण ठाकुरांच्या घरी पाणी मिळत असेल तर ठाकुरांचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दिला आहे.
-
मुक्ताईनगरात फिल्म स्टार गोविंदा यांचा रोड शो
मुक्ताईनगरात महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ फिल्म स्टार गोविंदा यांचा रोड शो मुक्ताईनगर मध्ये सुरू आहे. गोविंदाचा गाण्यावर कार्यकर्त्यांसह नागरिक थिरकले. गोविंदा सोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
-
मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना पाडा-मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना पाडा, असे थेट वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यात केले आहे. मी कोणाचे नाव घेणार नाही मात्र ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असाही संदेश दिला. मनोज जरांगे पाटील यांचा सकल मराठा समाज बांधवांना संदेश दिला आहे.
-
राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जहरी टीका
भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राच सरकार तुमच्या हातून चोरलं असा आरोप राहुल गांधी यांनी केला. धारावीची जमीन घेता, मग कुलाब्याची जमीन का घेत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.
-
बाळासाहेबांविषयी कायम आदर
आमचे विचार वेगळे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कायम आदर आहे, असे वक्तव्य प्रियंका गांधी यांनी केले. शिर्डी येथे सभेत त्यांनी भाजपा आणि महायुतीवर तिखट प्रहार केला.
-
18 तारखेला नेरूळ येथील रामलीला मैदानावर अमित शहा यांची तोफ धडाडणार
नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी 18 तारखेला नेरूळ येथील रामलीला मैदानावर प्रचार सभा घेत आहेत.केंद्रीय नेतृत्व म्हणून अनेक उमेदवारासाठी सयुक्तिक सभा घेतली जाते,मात्र अमित शहा एका उमेदवारासाठी सभा घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अमित शहा यांच्या 18 तारखेच्या सभेकडे संपूर्ण नवी मुंबईचे लक्ष लागून राहिले असून,ते या सभेतून कुणाचा समाचार घेतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.
-
नातं जपायला ताकद लागते नाती तोडायला नाही
वळसे पाटील आणि पवार कुटुंबाचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे हे मी कधीच विसरणार नाही. समोरचा कसाही वागला तरी मी तरी त्यांबद्दल काहीही बोलणार नाही पण नातं जपायला ताकद लागते, नाती तोडायला नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दिलीप वळसे पाटलांना सुनावले
-
मनोज जरांगे भुजबळांच्या बालेकिल्ल्यात
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर मराठा नेते मनोज जरांगे-पाटील येवला दौऱ्यावर आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला तालुक्यातील गवंडगाव येथे मनोज जरांगे पाटलांचा ताफा दाखल झाला आहे. यावेळी मनोज जरागे यांचे गवंडगाव जोरदार स्वागत करण्यात आला.
-
प्रियंका गांधी यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
प्रियंका गांधी यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. शिर्डी विमानतळावर बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. त्या साईदर्शनासाठी मंदिरात जाणार आहेत. दर्शनानंतर सभेला करणार संबोधित करणार आहे.
-
ओबीसी वर्गातील तीनच अधिकारी- राहुल गांधी
राज्यात दलित १५ टक्के आहे. पण ९० अधिकाऱ्यांमध्ये तीन अधिकारी तुमचे आहे. १०० रुपये वाटले जात असतील तर सर्व अधिकारी निर्णय घेतात. दलित एक रुपयाचा निर्णय घेतात. आदिवासी १० पैशाचा निर्णय घेतात. ओबीसी वर्गातील तीन अधिकारी आहे. त्यांना छोटे विभाग दिले आहेत. ओबीसी अधिकाऱ्यांना जोडलं तर ते फक्त पाच रुपयांचा निर्णय घेतात, असे राहुल गांधी यांनी प्रचारसभेत सांगितले.
-
पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय – राहुल गांधी
“मोदी-शाहंनी महाराष्ट्रातल सरकार चोरलं. मोदी-शाह, अदानींच्या बैठकीत आमदार खरेदीचा प्लान. धामणगाव रेल्वे मतदारसंघात राहुल गांधींची सभा. पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
-
धारावी अदानींच्या हातात देण्यासाठी सरकार चोरलं – राहुल गांधी
“धारावीच्या जमिनीचा सौदा झाला म्हणून आमदारांना कोट्यवधी दिले. कोट्यवधी रुपये देऊन आमदारांना विकत घेतलं. आमदार कुणाच्या सांगण्यावरुन खरेदी केले, सर्वांना माहित आहे. धारावी अदानींच्या हातात देण्यासाठी सरकार चोरलं. कोट्यवधी रुपये देऊन आमदारांना विकत घेतलं” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
-
60 जागांपैकी 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या – अजित पवार
“मी यावेळी सोशल इंजिनियरिंग केले. 60 जागांपैकी 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या. विधान परिषदेत अल्पसंख्याक समाजाला एकही जागा नव्हती. त्यामुळे मी लगेच इंद्रिस नायकवाडी यांना आमदार केले. काँग्रेसने पण केले नाही. त्यामुळे सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका. मी 10 टक्के जागा महिला, मागासवर्गीय, आदिवासी समाजाला देऊन न्याय दिला” असं अजित पवार म्हणाले.
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच आमदार यशवंत माने यांच्याकडून खंत व्यक्त
यशवंत माने यांची भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता टीका. “महायुती धर्म पाळणे सर्वांची जबाबदारी. मात्र आपल्यातील काही लोक मदत करत नाहीत. यशवंत माने यांची महायुतीतील नेत्यांबाबत नाराजी. जे स्टेजवर आहेत तेवढेच आपले काम करत आहेत, बाकीचे केवळ आपल्यासोबत आहेत पण काम करत नाहीत. दादा आपल्या इथे एक बोलतील आणि मुंबईत येऊन तुम्हाला कानात सांगतील आम्ही काम करतोय म्हणून” असं यशवंत माने म्हणाले.
-
महायुतीने आता मुख्यमंत्री पदाचा नाही तर विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण यावर चर्चा करायला हवी – बाळासाहेब थोरात
महायुतीकडे बोलण्यासारख काही नाही त्यामुळे धर्मावर , जातीवर बोलत आहेत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. महागाई, रोजगारावर ते बोलत नाहीत.
आम्हाला अगोदर महायुतीचं सरकार घालवायचय, मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरवू. महायुतीने आता मुख्यमंत्री पदाचा नाही तर विरोधी पक्षनेत्याचा चेहरा कोण यावर चर्चा करायला हवी असेही थोरात म्हणाले.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज चिमूर येथे दुपारी 2 वाजता जाहीर सभा
चंद्रपूर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज चिमूर येथे दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधी सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत .
12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा चिमूर येथे प्रचार सभा घेतली होती.
-
संजय राऊत आणि त्यांचा पक्ष निद्रावस्थेत आहे – आशिष शेलार
संजय राऊतांना मतदानात झोपवणार. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष निद्रावस्थेत आहे. खऱ्या अर्थाने जे अंबानींच्या लग्नात नाचले त्यांचा नाचा करायला हवा होता का, आशिष शेलार यांनी ही टीका केली आहे.
-
काँग्रेस व्होट जिहाद करत आहेत – देवेंद्र फडणवीस
मविआकडून व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न करत आहे, काँग्रेस जाती-जातींमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे.
-
काँग्रेसचा आज मुंबईसाठी स्वतंत्र जाहीरनामा
काँग्रेस आज मुंबईसाठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर करणार आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर सर्वात मोठा फोटो बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. विशेष म्हणजे पोस्टरवर सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांचा देखील फोटो नाही. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पोस्टरवर सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांचे फोटो आहेत, मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्यानं विशेष महत्त्व
-
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही – अजित पवार
मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांपाठोपाठ अजित पवार यांचं हे विधान समोर आलं आहे. निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू. आम्ही 175 पेक्षा अधिक जागा जिंकणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला .
-
Maharashtra News: प्रियांका गांधी आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
प्रियांका गांधी आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर… नगर – मनमाड महामार्गाच्या शिर्डीजवळील दौलतबाग परिसरात सभेचं आयोजन… जिल्ह्यातील मविआ उमेदवारांसाठी प्रियंका गांधी यांची सभा…
-
Maharashtra News: अब ना बटेंगे ना कटेंगे… नाशिक शहरात लागले बॅनर
अब ना बटेंगे ना कटेंगे… नाशिक शहरात लागले बॅनर… विश्व हिंदू परिषदेकडून नाशिक शहरात लावण्यात आले बॅनर.. मुस्लिम बहुल भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लावण्यात आलेत बॅनर… हिंदू हितासाठी १००% मतदा करा… अशा आशयाचे बॅनर
-
Maharashtra News: भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुण्यातील निवासस्थानी माजी राष्ट्रपतींनी केले मतदान. प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून, निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग उपक्रमानुसार घरीच बजावला मतदानाचा हक्क…
-
मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. कायगाव टोका येथील गोदावरी नदी पात्रावर ठोक मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या पुतळ्यांचं दहन करणार आहेत. पुतळ्याचे दहन करून गोदावरी नदी पात्रात जलसमाधी देणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अनेक कार्यकर्ते कायगाव टोका नदी पुलावर एकत्र आलेत.
-
राज ठाकरे यांच्या आज नाशिकमध्ये दोन सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज नाशिकमध्ये दोन सभा होणार आहेत. नाशिकच्या सातपूर आणि सिडको मध्ये दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतली राज ठाकरे यांची नाशिक मधली पहिलीच जाहीर सभा होत आहे. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नाशकात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे.
-
कोथरूडमधील तिन्ही उमेदवारांना नोटीस
पुण्यात चंद्रकांत पाटलांसह तीन प्रमुख उमेदवारांना नोटीस आली आहे. कोथरूडमधील तिन्ही उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून नोटीस आली आहे. उमेदवारांनी दिलेल्या दैनंदिन खर्चात तफावत आढळल्याने कारणे दाखववा नोटीस आली आहे. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठवण्यात नोटीस आली. निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर निबंध ठेवण्यासाठी ४० लाख खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याच खर्चात तफावत असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
-
शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
शिरूर तालुक्याच्या मांडवगण फराटा परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. घरासमोरील अंगणात खेळत बिबट्याने चिमुकल्याला उसाच्या शेतात ओढत नेले यात शिवतेज टेंभेकर या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. वन विभाग आणि ग्रामस्थांमध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली .गेली तीन महिन्यातील बिबट्याची हल्ल्यातील मृत्यूची हि तिसरी घटना असल्याने ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वन विभागा पुढे असणार आहे.