शरद पवार विधानसभेपूर्वी करणार मोठी खेळी, शिंदे गटाच्या मंत्र्याच्या कुटुंबातील व्यक्ती करणार पक्षप्रवेश
"मला शरद पवारांचे विचार खूप आधीपासून पटतात. त्यामुळे मी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे. तसेच मी शरद पवार यांच्या पाठीशी उभं राहणार आहे", असे ते म्हणाले.
Anil Sawant Will Join Sharad Pawar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते, तशा राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झालं आहे. आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एक मोठी खेळी करणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे ताकदवान नेते म्हणून ओळख असलेल्या तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनिल सावंत हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता अनिल सावंत यांनी यावर थेट भाष्य केले आहे. मला शरद पवारांचे विचार खूप आधीपासून पटतात. त्यामुळे मी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे. तसेच मी शरद पवार यांच्या पाठीशी उभं राहणार आहे, असे अनिल सावंत यांनी म्हटले.
अनिल सावंत काय म्हणाले?
सावंत कुटुंब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी मला शरद पवार यांच्यासोबत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा, पक्ष वेगळा आहे आणि त्यांचे विचारही वेगळे आहेत. मात्र माझे विचार शरद पवारांसोबत राहण्याचे आहेत. कुटुंब म्हणून आम्ही एक परिवार असलो तरी आमच्यात राजकीय मतभेद आहेत. त्यामुळे मी या वेळेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची तुतारी मागितली आहे. यासाठी पवार साहेब व सुप्रियाताई यांची भेट घेतली आहे. माझी या मतदारसंघासाठी असणारी विकासाची भूमिका मी शरद पवारांना सांगितले आहे, असे अनिल सावंत यांनी म्हटले.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा आजवर म्हणावा तसा विकास झालेला नाही. दुष्काळी मंगळवेढ्याच्या 32 गावांचा पाणी प्रश्न तर प्रत्येक निवडणुकीत गाजतोच. जर मला संधी दिली तर परत कुठल्याही निवडणुकीत मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न येणार नाही. जर मला उमेदवारी मिळाली तर आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ. पण जर उमेदवारी मिळाली नाही तरी साहेब सांगतील त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवू, असा विश्वास अनिल सावंत यांनी केला आहे.
शरद पवार नेमकी कोणाला उमेदवारी देणार?
दरम्यान अनिल सावंत हे सध्या मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यात गावोगावी दौरे करत आहेत. त्यांनी महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रमही सुरु केला आहे. सध्या हा कार्यक्रम लोकप्रिय ठरत आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भगीरथ भालके हे तुतारीकडून इच्छुक आहेत. त्यांच्याशिवाय वसंतराव देशमुख, नागेश भोसले असे अनेक दिग्गज तुतारीकडे तिकीट मागत आहेत. त्यातच अनिल सावंत यांनी मागणी केल्यामुळे या मतदारसंघाची रंगत वाढत चालली आहे. आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी शरद पवार नेमकी कोणाला उमेदवारी देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.