Maharashtra Marathi News Live : हाक दिल्यानंतरही मुख्यमंत्री आले नाहीत, जरांगे यांची उद्या सविस्तर पत्रकार परिषद

| Updated on: Sep 14, 2023 | 7:50 AM

Maharashtra Breaking news LIVE Updates | महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यावरच उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे जालन्याला जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Marathi News Live : हाक दिल्यानंतरही मुख्यमंत्री आले नाहीत, जरांगे यांची उद्या सविस्तर पत्रकार परिषद
Follow us on

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित राहणार. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक. बैठकीकडे सर्वांचं लक्ष. मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडण्याची शक्यता. खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती आज जालन्यात जाण्याची शक्यता. साताऱ्यातील पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट. यासह राज्य आणि देशातील घटनाघडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Sep 2023 10:32 PM (IST)

    Manoj Jarange | मनोज जरांगे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार

    जालना | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येणार होते. पण आता 10 वाजले तरी मुख्यमंत्री आलेले नाहीत. आम्ही सरकारच्या शब्दाला डाग लागू दिला नाही. जे प्रस्ताव दिले ते आम्ही मान्य केले. त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली ती आम्ही दिली. मी आता आमरण उपोषण आणि नंतर साखळी उपोषण करणार आहे. आम्ही सरकारला वेठीस धरले नाही. सरकारने वेठीस धरले. आम्ही चांगले आणी वाईट बोलणार नाही. आले आणि नाही आले तरी आम्ही नाराज होणार नाही. एक महिना दिला आहे तोपर्यंत आम्ही विचारणार नाही. पण एक महिना झाला की प्रश्न विचारणार. मी उद्या सकाळी 11: 30 वाजता पत्रकार परिषद घेणार आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांसोबत चर्चा करणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    “मीच सर्व पर्याय देतो, सरकार देत नाही. सोळा दिवस झाले, औषध घेत असल्यामुळे बोलत आहे. आता आम्ही ठाम आहोत. आज मुख्यमंत्री यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही. गिरीश महाजन येणार आहेत. आता आल्यावर बोलू”, असंही जरांगे म्हणाले.

  • 13 Sep 2023 09:00 PM (IST)

    Kashmir | काश्मीरच्या अनंतनागमध्ये 3 जवान शहीद

    काश्मीर | काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीत 3 जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत राष्ट्रीय रायफ्लसचे मेजर आशिष डोनंक शहीद झाले. तसेच कर्नल मनप्रित सिंह आणि डीसीपी हुमायुन भट्ट शहीद झाले.


  • 13 Sep 2023 08:53 PM (IST)

    IRCTC Signs MOU With MSRTC | ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    मुंबई | एसटी बसचं तिकीट आता आयआरसीटीसी वेबसाईटवरुन (https://bus.irctc.co.in) बूक करता येणार आहे. त्यामुळे एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांनादेखील सोयीची होणार आहे. तसेच यामुळे भविष्यात एसटीचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

  • 13 Sep 2023 08:39 PM (IST)

    Eknath Shinde On Uddhav Thackeray | सुनक-शिंदे भेटीवरुन वार पलटवार

    मुंबई | ऋषी सुनक यांच्या भेटीवरुन केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे.”लंडनमधील सगळं बाहेर काढायची वेळ येऊ देऊ नका. उगाचच ‘पाटणकर’ काढा घेण्याची वेळ आणू नका”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

  • 13 Sep 2023 08:29 PM (IST)

    Aliens | पेरु देशातील खदानीत एलियन्सचे मृतदेह सापडले

    मेक्सिको | मेक्सिकोच्या संसेदत एलियन्सचे 2 मृतदेह दाखवण्यात आले आहेत. या एलियन्सच्या हाताला आणि पायाला प्रत्येकी 3 बोटं होती. पेरु देशातील खदानीत हे मृतदेह सापडलेत. एलियन्सचे हे मृतदेह 1 हजार वर्षांपूर्वीचे असल्याची शक्यता आहे.

    एलियन्सचे मृतदेह

  • 13 Sep 2023 08:00 PM (IST)

    Aurangabad News : गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे औरंगाबादमध्ये दाखल

    गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे औरंगाबाद शहरात दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात दाखल झाले आहेत. रात्री उशिरा शिष्टमंडळासह मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. उपोषण सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे.

  • 13 Sep 2023 07:44 PM (IST)

    Delhi News : भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकताच दाखल

    भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झाले आहेत. मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार हा केला जाणार आहे.

  • 13 Sep 2023 07:23 PM (IST)

    Mumbai News : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी 

    पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वांद्रे ,विलेपार्ले, सांताक्रुझ, अंधेरी येथील महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन्ही रस्त्यांवर वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.

  • 13 Sep 2023 07:17 PM (IST)

    Pune News : पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी

    पुणे विमानतळावर कस्टम विभागाकडून 33 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईवरून आलेला प्रवासी करत होता अवैधरित्या सोन्याची तस्करी. प्रवाशाने कॅप्सूल मध्ये लपवत आणले 33 लाख रुपयांचे 24 किलो सोने.

  • 13 Sep 2023 07:07 PM (IST)

    Kalyan News : कल्याणमध्ये कुणबी ओबीसी महासंघाचे आंदोलन

    कल्याणमध्ये कुणबी ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका, अशी कल्याण तालुका ओबीसी महासंघाने मागणी केलीये.

  • 13 Sep 2023 06:50 PM (IST)

    उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देणार

    केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन मंजूर केले आहेत. या योजनेसाठी सरकारने सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना 1,650 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन देण्यास मान्यता दिली आहे.

  • 13 Sep 2023 06:47 PM (IST)

    इंडिया समन्वय समितीची बैठक संपली

    भोपाळमध्ये पहिल्या आठवड्यात इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. भाजपाविरोधात एकत्र लढण्यावर पुन्हा एकदा चर्चा झाली. या बैठकीला शरद पवार यांचीही उपस्थिती होती.

  • 13 Sep 2023 06:35 PM (IST)

    लिबियातील डर्ना शहरात पुरामुळे मृतांची संख्या 5,202 वर

    पूर्व लिबियातील डर्ना शहरात पुरामुळे मृतांचा आकडा 5,202 वर पोहोचला आहे. पूर्व लिबियातील आपत्कालीन केंद्राचे प्रवक्ते ओसामा अली यांनी सांगितले की, प्रदेशातील मृतांची संख्या किमान 5,202 वर पोहोचली आहे. तर 7,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

  • 13 Sep 2023 06:21 PM (IST)

    मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश

    मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. गरज असेल तर आंदोलकांना औषध उपचार पुरवा असंही सांगितलं आहे.

  • 13 Sep 2023 06:20 PM (IST)

    दलाई लामा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान सिक्कीमला भेट देणार

    तिबेटचे आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान सिक्कीमला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी एका बैठकीत ही घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, दलाई लामा 10 ऑक्टोबरला सिक्कीमला येतील आणि 14 ऑक्टोबरला परततील.

  • 13 Sep 2023 06:03 PM (IST)

    विशेष अधिवेशन : सरकारने 17 सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली

    18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सरकारने 17 तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

  • 13 Sep 2023 04:57 PM (IST)

    India Alliance News : इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात

    नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील बंगल्यावर या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत इंडिया आघाडी आता कोणते धोरण आखणार आहे ते समोर येईल. तसेच आघाडीची पुढील रुपरेषा पण समोर येईल.

  • 13 Sep 2023 04:38 PM (IST)

    Manoj Jarange News : मुख्यमंत्री येणार की नाहीत हे मला माहिती नाहीत

    मुख्यमंत्री येणार की नाहीत हे मला माहिती नाहीत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आता जोपर्यंत समोर कोणी येत नाही, तोपर्यंत काहीच बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळ येणार की मुख्यमंत्री येणार याविषयीची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

  • 13 Sep 2023 04:31 PM (IST)

    CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री जालन्याला जाणार नाहीत?

    सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अंतरवेली सराटीमध्ये जाणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लागलीच जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

  • 13 Sep 2023 04:23 PM (IST)

    CM Eknath Shinde News : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील

    मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. काही लोकांनी खोडसाळपणा करुन व्हिडिओ व्हायरल केला. त्यातून मराठा समाजात सरकारविषयी संभ्रम तयार करण्यात येत आहे. मराठा समाजाने कुठल्याही दुषप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

  • 13 Sep 2023 04:17 PM (IST)

    CM Eknath Shinde News : आरक्षणावर पहिल्यांदाच सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली

    आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत चर्चा झाली. व्हायरल व्हिडीओबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. काही विघ्नसंतोषी लोक मराठा समाजात संभ्रम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 13 Sep 2023 04:11 PM (IST)

    Manoj Jarange News : मुख्यमंत्र्यांचे जालन्यामध्ये स्वागत

    मुख्यमंत्री आल्यावरच उपोषण सोडणार असल्याचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्याकडे तातडीने रवाने झाले. त्यांचे जालना जिल्ह्यात स्वागत असल्याचे वक्तव्य जरांगे यांनी केले.

  • 13 Sep 2023 04:04 PM (IST)

    Maratha Reservation : मुख्यमंत्री संध्याकाळी अंतरवेली सराटीमध्ये

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज संध्याकाळी जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटीमध्ये दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आल्यावरच उपोषण सोडणार असल्याचे म्हटले होते.

  • 13 Sep 2023 04:01 PM (IST)

    नवा घरोबा झाला की धुसपुस असते- दीपक केसरकर

    प्रत्येक घरात थोडीशी धुसपुस असते. विशेषतः नवा घरोबा झाला की अशी धुसपुस असते. ही धुसपुस लवकरच संपेल. मी हसन मुश्रीफ याच्याशी बोलणार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

  • 13 Sep 2023 03:28 PM (IST)

    राज्य सरकारचा तिजोरी लुटण्याचा डाव- विजय वडेट्टीवार

    मनोज जरांगे-पाटलांची शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता निशाणा साधला आहे. त्यासोबतच यावेळी बोलताना वडेट्टीवारांनी राज्य सरकारचा तिजोरी लुटण्याचा डाव असून 9 संस्था सरकारला चुना लावणार आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

     

  • 13 Sep 2023 01:57 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी छावा मराठा संघटना आक्रमक

    मराठा आरक्षणासाठी छावा मराठा संघटना आक्रमक झाली आहे. शिर्डी सिन्नर हायवेवर रास्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत.  तसंच सिन्नर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या वेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  येणारी जाणारी वाहने रोखत छावा मराठा संघटनाने रस्त्यावर ठिया मांडला. कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची गाडी आंदोलकांनी अडवली. या गाडीत आशुतोष काळे यांच्या मातोश्री होत्या.  मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

  • 13 Sep 2023 01:45 PM (IST)

    कोल्हापुरात स्वाभिमानीचा मोर्चा

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येत आहे.  ऊसाला दुसरा हप्ता 4000 रुपये देण्याचा प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी संघटना रस्त्यावर उतरली आहे. ताराराणी चौकातून साखर सहसंचालक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. मोर्चासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते ताराराणी चौकात जमले आहेत.

  • 13 Sep 2023 12:51 PM (IST)

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, धाराशिवमध्ये मराठा समाजाचं आंदोलन

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या अन्यथा 17 सप्टेंबरला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करणार आहेत.  सोलापुरात जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत.  मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 50 टक्केच्या आत आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरक्षण देताना कुणबी ऐवजी हिंदू मराठा म्हणून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.  मराठा आरक्षण न दिल्यास 17 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

  • 13 Sep 2023 10:54 AM (IST)

    ठाकरे गटाच्या आमदारांची उद्या ११ वाजता विधानभवनात बैठक

    ठाकरे गटाच्या आमदारांची उद्या ११ वाजता विधानभवनात बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. अध्यक्षांसमोर सुनावणीसाठी जाण्याआधी या बैठकीत आमदार एकत्रित चर्चा करणार असल्याचे समजते.

    बैठकीसाठी वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 13 Sep 2023 10:49 AM (IST)

    किशोरी पेडणेकर चौकशीसाठी मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल

    मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोर पेडणेकर या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग घोटाळाप्रकरणी पेडणकर यांची आज पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

  • 13 Sep 2023 10:39 AM (IST)

    पक्षाचा आदेश आल्यास लोकसभा लढवणार – एकनाथ खडसे

    इंडिया आघाडीतून रावेरची जागा मिळाल्यास लोकसभा निवडणूक लढवणार, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

  • 13 Sep 2023 10:31 AM (IST)

    ठाकरे गटाच्या आमदारांची उद्या विधानसभा अध्यक्षांसमोर होणार महत्वाची सुनावणी

    ठाकरे गटाच्या १४ आमदारांची उद्या विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.

    ठाकरे गटाच्या ७ आमदारांनी काल पत्राद्वारे आपलं म्हणणं मांडल. उर्वरित ७ आमदार आज पत्राद्वारे त्यांचा मुद्दा मांडणार आहेत.

  • 13 Sep 2023 10:21 AM (IST)

    अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

    अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झालं आहे. नियम न पाळल्याने ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

     

  • 13 Sep 2023 10:11 AM (IST)

    संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका

    संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे, आता का देत नाहीत ? असा सवालही राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

  • 13 Sep 2023 10:08 AM (IST)

    फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण – संजय राऊत यांचा आरोप

    फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण सुरू  आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

    संभाजीनगर येथील बैठकीत अडथळा नको म्हणून जरांगे पाटील यांना गुंडाळलं जात आहे. पण तो गुंडाळला जाणारा माणूस नाही, असेही राऊत म्हणाले.

  • 13 Sep 2023 10:03 AM (IST)

    केंद्र सरकारचा रडीचा डाव सुरू – संजय राऊत यांचे टीकास्त्र

    इंडिया आघाडीच्या बैठकीला जाता येऊ नये म्हणून अभिजीत बॅनर्जींना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

    मात्र आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

  • 13 Sep 2023 09:52 AM (IST)

    LIVE UPDATE | आझम खान यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

    आझम खान यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. लखनऊ, रामपूर, मेरठ, गाझियाबाद, सहारपूर, सीतापूर येथे छापेमारी करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सपा नेते आझम यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली आहे.

     

  • 13 Sep 2023 09:42 AM (IST)

    LIVE UPDATE | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. फडणवीस समितीचे सदस्य असल्याने बैठकीला हजर राहणार आहेत. आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक ठरणार आहे.

  • 13 Sep 2023 09:34 AM (IST)

    LIVE UPDATE | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस

    मराठा समाजाला सरसगट आरक्षण आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे या करिता एक महिन्याचा वेळ दिला आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील ही आम्हला खात्री आहे असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच आंदोलकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात साखळी उपोषण सुरू करावे आणि कुणीही उग्र आंदोलन करू नये असे अवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

  • 13 Sep 2023 09:20 AM (IST)

    LIVE UPDATE | लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळानंतर हाहाकार

    लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळानंतर हाहाकार माजला आहे. पूरामुळे ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० हजार जण बेपत्ता आहेत. बचावकार्यातील १२३ जवान बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी मिळत आहे.

  • 13 Sep 2023 08:58 AM (IST)

    India Alliance : शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

    इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक. दिल्लीतल्या शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी होणार बैठक. सायंकाळी 4 नंतर होणार बैठक. लोकसभा निवडणुकीच जागा वाटप, विशेष अधिवेशनाची रणनीती, आगामी निवडणूका आणि लोगोबाबत होऊ शकते चर्चा.

     

  • 13 Sep 2023 08:47 AM (IST)

    Maratha Reservation : आज भव्य मराठा क्रांती मोर्चा

    बुलढाणा येथे आज भव्य मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण मागणी तसेच जालना येथील घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. काळे कपडे घालून मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. तरुण-तरुणी मोर्चाला संबोधित करणार आहेत. हजारो मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 13 Sep 2023 08:26 AM (IST)

    Road Accident : महामार्गावर भीषण अपघात

    जयपूर-आग्रा महामार्गावर भारतपूर हांत्रा येथे एका ट्रेलरने बसला धडक दिली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत. राजस्थानमध्ये हा भीषण अपघात झाला.

  • 13 Sep 2023 08:05 AM (IST)

    Maratha Reservation : दगडफेकीनंतर बस पेटवली

    नांदेड-वसमत रोडवर 20 ते 25 जणांच्या जमावाने बसवर दगडफेक केली. बस पेटवून दिली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा दिल्या, अशी वाहकाने माहिती दिलीय.

  • 13 Sep 2023 08:00 AM (IST)

    pune police : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्टवर

    सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्याभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पुणे पोलिसांनी पुणेकरांना केलं आहे. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्यास पुणे पोलीस कडक कारवाई करणार आहे. आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सरसावले आहेत.

  • 13 Sep 2023 07:46 AM (IST)

    rss meeting : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्या बैठक, राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार

    पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक पार पडणार आहे. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान ही बैठक होत आहे. या बैठकीत राम मंदिर लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या रूपरेषेवरही बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. अयोध्येत साकारल्या जात असलेल्या राम मंदिरांचा मुद्दा बैठकीत केंद्रस्थानी असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभर हिंदू समाज जागरण अभियान राबवले जाणार आहे.

  • 13 Sep 2023 07:36 AM (IST)

    sharad pawar : शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बैठक होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची आज पहिलीच बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार संजय राऊत यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप, इंडिया आघाडीचा लोगो आणि 18 तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 13 Sep 2023 07:32 AM (IST)

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार?; नवी अट काय?

    मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती जालन्यात आले तरच मी उपोषण सोडेन. नाही तर महिनाभर घरीच जाणार नाही, अशी अटच जरांगे पाटील यांनी ठेवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जालन्यात जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 13 Sep 2023 01:30 AM (IST)

    कोल्हापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफुस

    कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचं काम अडवलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफुस पाहायला मिळतेय. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठी वादावादी झाली. शिवसेनेने अधिकाऱ्याला जाब विचारला. राष्ट्रवादीला घेऊन अडचण झाल्याचाही आरोप राजेखान जमादार यांनी केला आहे.

  • 13 Sep 2023 01:15 AM (IST)

    पायी चालत आणि लेझीम खेळत येत, मनोज जरांगे यांना मराठा समाज बांधवांचा पाठिंबा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं, म्हणून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज मोठ्या संख्येने येत आहे. आज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लेझीम खेळत अंबड तालुक्यातील मोहिते वस्ती येथील नागरिक अंतरवाली सराटीत दाखल झाले.