गेल्यावेळीही तिघेच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल…, एकनाथ शिंदेंची कोपरखळी, अजित दादा म्हणाले तुमच्या मनातून… नेमकं काय घडलं?

अजित पवार यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या २०२४ च्या अर्थसंकल्पात महिला, कृषी आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारातील बदलाला हास्यास्पद पद्धतीने प्रतिसाद दिला, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या विधानांना योग्य उत्तर दिले.

गेल्यावेळीही तिघेच होतो, आता फक्त खुर्च्यांची अदलाबदल..., एकनाथ शिंदेंची कोपरखळी, अजित दादा म्हणाले तुमच्या मनातून... नेमकं काय घडलं?
devendra fadnavis eknath shinde ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 10, 2025 | 4:41 PM

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (१० मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावेळी त्यांनी महिला, कृषी, पर्यटन, ज्येष्ठ नागरिकांसाठी भरघोस तरतुदी केल्या. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडल्याचे म्हटले. येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज अजित पवारांनी वर्तवला.

यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कोपरखळी मारली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी खुर्ची बदलल्याची मनातील सलही बोलून दाखवली. यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना चोख उत्तर दिले.

नेमकं काय घडलं?

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले काही मुद्दे सांगितले. तसेच विविध तरतुदी केल्याचेही म्हटले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी “गेल्यावेळीही आम्ही तिघे होतो. आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे”, असे म्हटले. यावर सर्वजण हसायला लागले.

पुन्हा वाक्याची सारवासारव

त्यानंतर अजित पवारांनी “तुमच्या मनातून ते काही जात नाही… ” असे हसत हसत म्हटले. त्यावरही जोरदार हशा पिकला. यानंतर एकनाथ शिंदेंनी पुन्हा वाक्याची सारवासारव करत “अदलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे”, असे म्हटले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “अदलाबदल झाली तरी बदलाबदली झालेली नाही”, असा टोला एकनाथ शिंदेंना लगावला. “आम्ही एकत्र टीम वर्क म्हणून काम केले. गेले अडीच वर्ष आम्ही काम करत आहोत. आता तेच आम्ही पुढे नेत आहोत. राज्याचा सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.